पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र)
पुणे: गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परंतु पुणे पोलिसांकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नसून महामार्गांसाठी वरिष्ठस्तरावरून आदेश काढण्यात आले आहेत. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसून कारवाई केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.
पुणे शहरात दुचाकीस्वारासोबत सहप्रवाशांनी देखील हेल्मेट घालावे अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार, अशा बातम्या गेली दोन दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. यामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याने महामार्गांवरील दुचाकीस्वार व सहप्रवाशांसाठी हे आदेश काढण्यात आल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलं आहे.
याविषयी बोलताना आमदार रासने म्हणाले, “गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई कडक करण्यात येणार असून सहप्रवाशाला देखील हेल्मेट असणे गरजेचे असल्याचे वृत्त येत आहे. यामुळे मध्यवस्तीतील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असून अनेकांनी मला फोन करून विचारणा केली. याबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे आदेश महामार्गांसाठी असून मध्यवस्तीतील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसल्याच सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु वाहतुकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच असतात महामार्गांवर गाडी चालवताना सर्वांनी त्याचे पालन करावे,’
दुचाकीस्वारासह सहप्रवाशानेही हेल्मेटचा वापर करण्याच्या आदेशाच्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून सुरुवातीला जनजागृती करण्यात येणार आहे. दुचाकी चालविताना संबंधितांनी हेल्मेटचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून, तूर्तास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार नाही-
– अमितेश कुमात, पुणे पोलीस आयुक्त
हेही वाचा: Traffic Rules: दुचाकी चालकांसोबतच सहप्रवाशांनाही हेल्मेटची सक्ती; वाहतूक विभाग कडक कारवाई करणार
नेमके प्रकरण काय?
विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई होत असताना आता सहप्रवासी (दुचाकीवरील पाठिमागे बसलेला) याच्यावर देखील हेल्मेट परिधान न केल्यास कारवाई होणार आहे. त्यामुळे आता एखादा वाहन चालक मित्राला किंवा त्याच्या सहकाऱ्याला दुचाकीवर विना हेल्मेट नेत असेल तर दंड वाहन चालकाला सोसावा लागणार आहे. येत्या काही दिवसात ही कारवाई तीव्र स्वरूपात करण्याचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाने सर्व पोलीस घटकांना दिले असल्याचे समोर आले आहे. राज्यात अपघातात वाहन चालक तसेच दुचाकीवरील सहप्रवासी यांच्या मृत्यु तसेच जखमींच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. हेल्मेट सक्ती असताना देखील अनेक वाहन चालक हेल्मेट परिधान करत नाहीत. तर, सहप्रवासी देखील हेल्मेट परिधान करत नाहीत. त्यामुळे आता विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई होणार आहे.