पुण्यात रामनवमीचा उत्साह (फोटो- तीन नवराष्ट्र )
पुण्यात रामनवमी उत्साहात साजरी
राम मंदिरात श्रीराम जन्म सोहळा थाटात साजरा
श्री रामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने आयोजन
पुणे: कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे… असे पाळण्याचे मंगल स्वर पेशवेकालीन ऐतिहासिक (Pune News) तुळशीबाग राम मंदिरात निनादले. मंदिरात श्रीराम जन्म सोहळ्यात झालेली फुलांची उधळण…रांगोळीच्या पायघड्या आणि गुरुवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी पाळणा हलताच श्रीराम नामाच्या झालेल्या एकत्रित जयघोषात वातावरण राममय झाले.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग राममंदिरात श्रीरामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाचे यंदा २६५ वे वर्ष असून संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले तसेच विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आणि कोटेश्वर तुळशीबागवाले यांच्यासह तुळशीबागवाले परिवाराने या उत्सवाचे आयोजन केले होते. यंदा विविध क्षेत्रातील मान्यवर मंदिरात दर्शनासाठी आले होते.
शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा
श्रीराम मंदिरात सकाळी श्रीरामाची मुख्य पूजा पार पडली. मंदिर परिसरात सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा झाला. श्रीराम जन्मानंतर मिळणारा श्रीरामाच्या वस्त्राचा ‘पागोट्याचा प्रसाद’ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. तर, सायंकाळी श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात पुणेकरांकडून पुष्पवृष्टीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये फुलांनी सजवलेल्या सभामंडपात २६५ वा श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा झाला असे प्रतिपादन डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी केले. यावेळी ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
Ram Navami: छंद नाही रामाचा तो देह….! रामनवमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा
रामनवमी निमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चा, अभिषेक, रामरक्षा पठण, सुंदरकांड, भजन-कीर्तन आणि नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दुपारी बारा वाजता प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा घंटानाद, शंखनाद आणि “जय श्रीराम”च्या घोषणांनी भक्तिमय वातावरणात पार पडला. शहरातील काही भागांत पालखी सोहळे, भव्य मिरवणुका आणि सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती. वाहतूक नियंत्रण, मंदिर परिसरातील बंदोबस्त आणि काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले होते, यामुळे उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.






