
गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे रविवारी (दि. १८) दौंड तालुक्यात पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि पुणे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदवीधर व शिक्षक मतदारांशी संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.
आमदार पवार यांनी सिने अभिनेते टायगर श्रॉफ आणि बारामती येथील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, शिक्षक, विद्यार्थी आणि पदवीधरांमध्ये सरकारबाबत प्रचंड नाराजी आहे. नोकऱ्या राहतील की नाही याबाबत शंका असून तरुण कर्जाचे हप्तेही भरू शकत नाहीत, त्यामुळे युवा वर्ग मोठ्या अडचणीत आहे. देशात आणि राज्यात सरकार विरोधात प्रचंड रोष आहे. शेतकरी कष्ट करून, घाम गाळून आपल्या मुलांना शिकवतात. पण आज परिस्थिती अशी आहे की, शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. एक करोड लोक शिक्षण घेतात, त्यापैकी केवळ ८ टक्के लोकांना नोकऱ्या मिळतात. शिक्षण घेऊन जर नोकरीच नसेल तर सरकारच्या विरोधात वातावरण तयार होणे स्वाभाविक आहे.
इंदापूरमध्ये एका आमदाराने “मतदान केले नाही तर डोके फोडू” अशी धमकी दिली. सरकारच्या विरोधात जो बोलेल, त्याला आत टाकले जाते. ही दडपशाहीची भूमिका असल्याची टीका त्यांनी केली. तसेच पुणे विद्यापीठात खोट्या डिग्री मिळत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपला हक्काचा आमदार असला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आगामी काळाबाबत बोलताना ते म्हणाले की, २०२९ नंतर आपलं सरकार येणार आहे. पुढील तीन वर्षे विरोधात राहून काम करायचे आहे. आमदार-खासदार फोडले, आता लोक हे सरकार फोडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज बेरोजगारी रोखणे आवश्यक असून प्रशिक्षण व मार्गदर्शन संस्था उभ्या केल्या पाहिजेत. रोजगाराच्या विविध योजना कागदावर आहेत, पण बँकेत गेल्यानंतर तरुणांना कर्ज मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा जनआक्रोश दिसून येत आहे, पण या आक्रोशाचे मतांमध्ये रूपांतर झाले पाहिजे. वातावरण चांगले आहे म्हणून शांत बसून चालणार नाही, सर्व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, इंदापूरमध्ये लवकरच मोठे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
यावेळी पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, राज्यात सरकारी, विशेषतः जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. युवा पिढी, विद्यार्थी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहेत. मोर्चा, आंदोलन करणाऱ्यांवर हे सरकार खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकते, दडपशाही आणि गुंडगिरी सुरू आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार बदलावेच लागेल. मात्र सध्या पुणे पदवीधर मतदार संघात सत्ताधाऱ्यांकडून दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे (शरद पवार) दौंड तालुकाध्यक्ष रामभाऊ टुले, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस अजित शितोळे, युवा तालुका उपाध्यक्ष प्रशांत ठोंबरे, सोशल मीडिया अध्यक्ष चैतन्य पाटोळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल खराडे, शहराध्यक्ष अतुल जगदाळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ans: ज्यातील वाढती गुंडगिरी, गोळीबार, चोरी आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आमदार-खासदार फोडण्यापेक्षा राज्यातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
Ans: बेरोजगारी, नोकऱ्यांची कमतरता, कर्जाचे हप्ते भरण्यात येणाऱ्या अडचणी आणि रोजगारासाठी कर्ज न मिळणे या समस्यांवर त्यांनी भाष्य केले. तरुणांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
Ans: २०२९ नंतर आपले सरकार येईल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. पुढील तीन वर्षे विरोधात राहून काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच इंदापूरमध्ये लवकरच मोठे आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.