पुणे शहराच्या तापमानात किंचित घट (फोटो- istockphoto)
ढगाळ वातावरणाने उकाडा मात्र कायम
पुणे शहराच्या तापमानात किंचित घट
पुणेकरांना काही प्रमाणात मिळाला दिलासा
पुणे: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून शहरात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तापमानात किंचित घट झाल्याने पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तरीही ढगाळ वातावरणामुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पुणे शहर व परिसरात सोमवारी (ता. १६) कमाल तापमानात घट नोंदवली गेली. शहराच्या उपनगर भागात कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविण्यात आले. तर पुण्याच्या मध्यवर्ती भागासह काही उपनगरांमध्ये कमाल तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले. किमान तापमानातही घट होऊन ते १६.४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र होते.
मंगळवारी (ता. १७) किमान व कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान सुमारे १७ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहील; मात्र दुपारी किंवा संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
Pune Weather: पुणेकर उकाड्याने हैराण; पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानात…
बुधवारपासून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून ते सुमारे २० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, तर कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत आकाश मुख्यतः निरभ्र राहील; मात्र दुपारनंतर व सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Pune Heat Wave: हुश्श! किती तो उन्हाळा; पुणेकर उकाड्याने वैतागले; पारा थेट…
पुणेकर उकाड्याने हैराण
शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ३५ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविले जात होते. शनिवारी (ता. १४) तापमानात आणखी वाढ झाली. लोहगाव परिसरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले. तर पुण्याच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. किमान तापमानातही वाढ होऊन ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. दरम्यान, शनिवारी पुणे व परिसरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आकाश मुख्यतः निरभ्र होते. दुपारी किंवा संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.






