पुण्यात उन्हाळा वाढला (फोटो- istockphoto)
पुणेकर नागरिक उकाड्याने हैराण
शहरात तापमानाचा पारा चढला
नागरिकांना करावा लागतोय कडक उन्हाचा सामना
पुणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने झेप घेतल्याने पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. बुधवारी (ता. ११) शहरात किमान १७.५ अंश सेल्सिअस, तर कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याने दुपारच्या सुमारास उकाड्यात अधिक भर पडली. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. सकाळच्या सुमारास उन्हाची तीव्रता तुलनेने कमी असली, तरी दुपारनंतर तापमान झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस गुरुवारी (ता. १२) आणि शुक्रवारी (ता. १३) तापमानात किंचित चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सुमारे १७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असून कमाल तापमान सुमारे ३७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
India Weather: लई अवघड रे गड्या! छत्री, रेनकोट सोडा अन्…; देशात यंदा उष्णतेचा कहर असणार
आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, शनिवारपासून (ता. १४) किमान आणि कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यातच तापमानात झालेली ही वाढ आगामी दिवसांत अधिक तीव्र उन्हाळ्याचे संकेत देत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
देशात यंदा उष्णतेचा कहर असणार
भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे या कालावधीसाठीचा हंगामी तापमान आणि पावसाचा अंदाज नुकताच जाहीर केला. यंदा देशातील उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च ते मे २०२६ या कालावधीत देशातील बहुतांश भागांत कमाल तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Maharashtra Weather Alert: सनस्क्रीन लावूनच घराबाहेर जा अन्यथा…; ‘या’ शहरात येणार उष्णतेची लाट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार संपूर्ण उन्हाळी हंगामात देशातील बहुतेक भागांत किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. मात्र दक्षिण भारतातील काही भाग आणि काही इतर ठिकाणी किमान तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. मार्च २०२६ महिन्याचा विचार करता देशातील अनेक भागांत कमाल तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र ईशान्य भारत, पूर्व भारतातील काही भाग, पश्चिम हिमालयीन प्रदेश तसेच मध्य आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात देशातील बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. तर उत्तर-पश्चिम भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भागांत किमान तापमान सामान्य ते कमी राहण्याची शक्यता आहे.






