संग्रहित फोटो
बालेवाडी-म्हाळुंगे रस्त्यावर दुचाकीवरून पडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तसेच म्हाळुंगे येथील गोदरेज हिल साईड-२ समोर वाहन घसरल्याने एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना अत्यंत दुःखद असून, निष्पाप नागरिकांना खराब रस्त्यांमुळे जीव गमवावा लागणे ही गंभीर बाब असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजीव गांधी इन्फोटेक पार्कसारख्या महत्त्वाच्या आणि जागतिक दर्जाच्या परिसरातील पायाभूत सुविधांसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक घेऊन ‘सिंगल पॉईंट अथॉरिटी’ची घोषणा केली होती. मात्र, या प्राधिकरणाने गेल्या वर्षभरात नेमके काय काम केले, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे. वर्षभरात रस्त्यांची साधी डागडुजी किंवा खड्डे बुजविण्याचे कामही प्रशासनाला करता आले नाही, ही अत्यंत नामुष्कीची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि विकासाच्या मोठ्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात नागरिकांना खराब रस्त्यांमुळे जीव गमवावा लागत असेल, तर हे प्रशासकीय अपयश आणि दुर्लक्ष अक्षम्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या परिसरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, ‘सिंगल पॉईंट अथॉरिटी’ने आतापर्यंत केलेल्या कामाचा आणि खर्च झालेल्या निधीचा संपूर्ण लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
“दर्जेदार रस्ते हा नागरिकांचा हक्क आहे. रस्ता हा मृत्यूचा सापळा बनता कामा नये. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून हे रस्ते सुरक्षित आणि प्रवासासाठी सुसह्य करावेत,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.






