पुण्यात शिक्षकांचे धरणे आंदोलन
पुणे : उच्च माध्यमिक स्तरावरील प्रस्तावित अन्यायकारक संचमान्यता धोरणाविरोधात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्या वतीने शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन व जोरदार निदर्शने करण्यात आली. शासनाच्या प्रस्तावित संचमान्यता मसुद्याचा यावेळी तीव्र निषेध करून प्रचलित निकषांनुसार संचमान्यता करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे संजय शिंदे, अविनाश बोर्डे या आंदोलनास विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सहसचिव दिलीप शितोळे, कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब बागडी, सातारा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सांगली जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश भिसे उपस्थित होते.
शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे म्हणाले, शिक्षकांच्या सेवासुरक्षेसोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि संस्थांच्या प्रत्यक्ष गरजा विचारात घेऊन शासनाने प्रस्तावित संचमान्यता धोरणात तातडीने सुधारणा करावी, राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसंदर्भात शिक्षण संचालनालयाने शासनाकडे सादर केलेला प्रस्तावित मसुदा अन्यायकारक असून त्याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील सुमारे ८ ते १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.
अनेक पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ होण्याचा धोका
तसेच अनेक पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षकांची सेवासुरक्षा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणणारे संचमान्यतेचे निकष तातडीने रद्द करावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे
– ४५ मिनिटांची तासिका ४० मिनिटांची करण्याचा शासनदरबारी प्रस्ताव
– एका बॅचसाठी विद्यार्थीसंख्या २० वरून ३० करण्याचा प्रस्ताव असून, त्याचा थेट परिणाम विज्ञान शाखेतील शिक्षकांच्या पदांवर होण्याची शक्यता.
– कला व वाणिज्य शाखांसाठी १२० विद्यार्थीसंख्येचा निकष
– तुकड्या कमी झाल्यास कार्यरत शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची शक्यता असल्याने सेवासुरक्षेचा प्रश्न गंभीर होणार.
– उच्च माध्यमिक स्तरावरील प्रवेश प्रक्रियेत होणारा विलंब आणि तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याचा आरोप.
Thane Dahi Handi 2026 : रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस






