संग्रहित फोटो
पुणे : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून, बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर नियुक्त नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवडणूक कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी नव्या प्रशासकीय भवनातील सभागृहात आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, तसेच सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, प्राप्त तक्रारींची तात्काळ नोंद घेऊन त्यांचे निवारण करावे. ‘सी-व्हिजिल’ ॲपवरील तक्रारींवर १०० मिनिटांत कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. राजकीय पक्षांच्या सभा, रॅली व फलकांसाठी एकखिडकी कक्षातून परवानग्या देताना आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी, असेही सांगण्यात आले.
परिवहन विभागाने वाहनांची तपासणी करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच एसएसटी, एफएसटी, नियंत्रण कक्ष व एकखिडकी कक्षातील नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्रांवर मतदारांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. केंद्रांवर फर्निचर, रॅम्प, वीज, पिण्याचे पाणी, शौचालय यांसह स्वच्छतेची योग्य व्यवस्था असल्याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह विविध विभागांचे नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन
राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोड घडत आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आता टप्प्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया आलेली नाही. महाविकास आघाडी काँग्रेससोबत असणार की नाही हे समोर आलेले नाही. त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.






