Pune Railway Station Security Alert: बापरे...!पुणे रेल्वे स्थानकांवर छुप्या कॅमेऱ्यांतून हेरगिरी? पुणे विभागात हाय अलर्ट
हे कॅमेरे भारतीय रेल्वेच्या गोपनीय हालचाली आणि सुरक्षा व्यवस्था पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला थेट प्रसारित केले जात होते. ही माहिती मिळताच, पुणे रेल्वे स्थानकासह संपूर्ण विभागात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला.
पुणे रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ही बाब गांभीर्याने घेतली आहे आणि स्टेशन परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, विशेष RPF पथके स्टेशनवर बसवलेल्या प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पुणे विभागाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा यांनी सांगितले की, पुणे स्थानकाबाबत अद्याप कोणतीही विशिष्ट अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, कोणत्याही सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये म्हणून व्यापक पडताळणी मोहीम सुरू आहे.
गाझियाबाद येथील हेरगिरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, पुणे रेल्वे विभागाने आपली सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली आहे. केवळ प्रत्यक्ष गस्तच नाही, तर आता आरपीएफ (RPF) सायबर सेल देखील पूर्णपणे सक्रिय झाला असून रेल्वेच्या डिजिटल नेटवर्कवर २४ तास बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
डिजिटल हेरगिरी रोखण्यासाठी विशेष मोहीम रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेले सर्व जुने आणि नवीन सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्यक्ष (Physical Verification) तपासावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश रेल्वेच्या मुख्य प्रणालीमध्ये कोणतेही अनधिकृत किंवा बाह्य उपकरण (External Device) जोडले गेले नाही ना, याची खात्री करणे हा आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या छुप्या कॅमेऱ्यांच्या धोक्यामुळे आता प्रत्येक इलेक्ट्रॉनिक पॉईंटची तांत्रिक तपासणी केली जात आहे.
सायबर सेलची भूमिका महत्त्वाची रेल्वेच्या अंतर्गत माहितीची गळती रोखण्यासाठी सायबर सेल तांत्रिक पातळीवर सज्ज झाला आहे.
सिस्टम ऑडिट: रेल्वेच्या सर्व्हर आणि कॅमेरा नेटवर्कचे तातडीने ऑडिट केले जात आहे.
डिजिटल क्रियाकलाप: स्थानक परिसरातील वाय-फाय नेटवर्क आणि डेटा ट्रान्सफरवर सायबर तज्ज्ञांची नजर आहे.
नेटवर्क सुरक्षा: बाहेरील कोणत्याही यंत्रणेला रेल्वेच्या फीडमध्ये प्रवेश (Access) मिळू नये, यासाठी फायरवॉल अधिक मजबूत केल्या जात आहेत.
प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन पुणे तसेच विभागातील इतर प्रमुख स्थानकांवरील पाळत ठेवणाऱ्या यंत्रणेचा (Surveillance System) वरिष्ठ स्तरावरून आढावा घेतला जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे, “रेल्वे स्थानक किंवा प्लॅटफॉर्मवर एखादे अनोळखी उपकरण, वायर किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास, त्या वस्तूला स्पर्श न करता त्वरित जवळच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला किंवा आरपीएफ चौकीला कळवावे. तसेच, देशाच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती सीमा ओलांडून शत्रू राष्ट्रापर्यंत पोहोचू नये, हे सुरक्षा यंत्रणांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यामुळेच तांत्रिक आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही स्तरांवर ही व्यापक तपासणी मोहीम राबवली जात आहे.






