पुणे : लष्करानंतर पोलीस दलाला शिस्तीचे दल म्हणून ओळखले जाते. मात्र, अलिकडच्या काळात पोलीस दलाला शिस्तीचा विसर पडला की काय अशी स्थिती पहायला मिळत असून, बदली झाल्यानंतर पोलीस ठाणे प्रमुख, घटक प्रमुख किंवा तत्सम अधिकाऱ्याला निरोप समारंभ हा एक सोहळा असल्यासारखा पार पाडला जात आहे. अशा अनावश्यक गोष्टींना ‘ब्रेक’ लावण्याबाबतचा आदेश पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिला आहे.
या गोष्टी चेष्टेचा विषय होतात, हे लक्षात घेऊन ते टाळावे. तसेच या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानंतर संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच घटक प्रमुखांना यासाठी जबाबदार धरण्यात येईल असेही आदेशात म्हटले आहे.
पोलीस दलात बदली होणे ही एक नित्याची बाब आहे. शासनाकडून वर्षाला कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले जातात. उपनिरीक्षक ते पोलीस आयुक्त तसेच अतिवरिष्ठांच्या बदल्या केल्या जातात. मात्र, अलिकडच्या काळात बदलीनंतर उत्साही वातावरणात ‘निरोप’ देण्याचा अन् त्याचा समारंभ करण्याचा धडाकाच सुरू झाला आहे.
पोलीस ठाण्याचे प्रभारी (पोलीस निरीक्षक) यांचीही बदली झाल्यानंतर त्यांचा निरोप समारंभ होत आहे. त्यांना फेटे बांधून केबिनमधून बाहेर पडताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जातो. त्याचे फोटो व व्हिडीओ काढले जात आहेत.
विशेष म्हणजे, हा सोहळा अत्यंत चर्चेचा विषय ठरतो. त्याहून महत्वाचे म्हणजे, प्रभारींचे कामकाज पाहणारे अन् जवळचे मानले जाणारे हा समारंभ पुढे होऊन स्वखर्चातून आयोजित करतात, असे दिसून येते.
दरम्यान, पोलीस निरीक्षकांसोबत आता अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा प्रकारे निरोप देण्यात आल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. नुकतीच अशी एक घटना घडली. संबंधित अतिवरिष्ठांची बदली झाल्यानंतर त्यांना फुलांनी सजवलेल्या जिप्सीतून अगदी निवृत्तीच्या वेळी देण्यात येतो तसाच निरोप दिला गेला. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. दरम्यान अशा घटना सातत्याने होत असल्याने शुक्ला यांनी अशा गोष्टी टाळा, असा आदेश सर्व घटकप्रमुखांना दिला आहे.
सजवलेल्या वाहनातून निरोप
पोलीस दलात एखादा घटकप्रमुख निवृत्त झाल्यानंतर त्यांना फुलांनी सजवलेल्या जिप्सीतून निरोप दिला जातो. जिप्सी फुलांनी सजवतात त्यात संबंधित अधिकारी उभा राहतो. त्या जिप्सीला दोन्ही बाजूंनी दोर लावला जातो आणि तो दोर ओढत अधिकारी हे काही अंतर जिप्सी खेचतात. अशा भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातो. पुण्यात पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना अशा पद्धतीने निरोप देण्यात आला होता.
ओन्ली इमोशनल ड्रामा…
पोलीस दलात देखील आता ‘ओन्ली इमोशनल ड्रामा’ पद्धत सुरू झाली आहे, अशी प्रतिक्रिया याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, आपल्या वरिष्ठांजवळ जाण्यासाठी अन् त्यांना खूश ठेवण्यासाठी अशा पद्धतीने त्यांचे स्वागत आणि निरोप दिला जातो. पोलीस निरीक्षक पदापर्यंत अशा गोष्टी अनेकवेळा व सातत्याने घडत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातही काही महिन्यांपूर्वी शहराच्या पूर्व भागातील एका बड्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची बदली झाल्यानंतर गालीचा घालून अन् फुलांचा वर्षाव करत निरोप देण्यात आला होता. त्याची शहरभर चर्चा सुरू होती.