फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
नांदेड : मराठा आरक्षणावरुन राज्यामध्ये वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवे म्हणून आग्रही आहेत. त्यांना सगेसोयरे शब्दांसह मराठा समाजाला ओबीसी आरक्षण हवे आहे. मात्र लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषण करत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. दरम्यान भाजप नेते व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले आहे.
राधाकृष्ण विखेपाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री विखे पाटील म्हणाले, ‘राज्य सरकार दोन्ही आरक्षणांबाबत विचार करत आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. राज्य सरकार त्यावर नक्की तोडगा काढेल. मात्र आरक्षणाचे आंदोलन आता भरकटत चालले आहे. जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे, असं नाही. आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. मनोज जरांगे पाटील म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही. बाकी या समाजासाठी काम करणारी लोकं भरपूर आहेत. आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत,” अशी सूचक प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
राधाकृष्ण विखेपाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव केला. यामुळे सुजय विखे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे 18 लाख रुपये भरुन पुर्नमतमोजणीची मागणी केली आहे. यावर राधाकृष्ण विखेपाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्री विखेपाटील म्हणाले, ‘सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीन वर संशय घेतला आहे. सुजय विखे हे उमेदवार होते. कार्यकर्त्यांचा एवढा आग्रह होता की, आम्ही काम केल्यानंतर असे निकाल येत असतील तर त्या आग्रहास्तव ईव्हीएमचा त्यांनी निर्णय घेतला आहे,’ असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.