श्रीवर्धन नगरपरिषदेत तटकरेंना मोठा धक्का
रायगड जिल्ह्यात सुनिल तटकरे यांना दुसरा धक्का बसला आहे. महाड पाठोपाठ श्रीवर्धन नगरपरिषदेत ही त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. इथं शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. श्रीवर्धन मतदार संघा हा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा मतदार संघ आहे. त्यांच्यासाठी ही हा मोठा धक्का समजला जात आहे. महाडमध्ये ही तटकरेंच्या राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागला आहे.
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणारा निकाल समोर आला असून तटकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष अभिनंदन जितेंद्र सातनाक यांचा या निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार ॲड. अतुल चोगले यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असून श्रीवर्धन नगरपरिषदेवर ठाकरे गटाचा झेंडा फडकला आहे. चोगले यांच्या विजयामुळे श्रीवर्धनच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.
माजी नगराध्यक्ष सातनाथ यांचा पराभव हा तटकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात असून, स्थानिक विकासकामे, जनतेतील नाराजी आणि बदलती राजकीय हवा या घटकांचा निकालावर प्रभाव पडल्याची चर्चा आहे. विजयानंतर बोलताना नगराध्यक्ष ॲड. अतुल चोगले यांनी श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराच्या पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि मूलभूत सुविधांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निकालामुळे श्रीवर्धन नगरपरिषदेतील सत्तासमीकरण पूर्णतः बदलले असून आगामी काळात स्थानिक राजकारण अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.






