सौजन्य - नवराष्ट्र टीम
माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि अमित गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे निगडी–आकुर्डी परिसरातील जुने, निष्ठावंत आणि इच्छुक कार्यकर्त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयात नेत्यांना उमेदवारीत प्राधान्य दिले जाणार, या भीतीतून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.
भक्ती-शक्ती चौकात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त मोडत आत्मक्लेश आंदोलन केले. पक्ष नेतृत्वाने ‘आयाराम’ उमेदवारांना प्राधान्य देऊ नये, तसेच अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात माजी महापौर आर. एस. कुमार, विजय सिनकर, समीर जावळकर, सलीम शिकलगार, अरुण थोरात, अतुल इमानदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. “पक्ष वाढवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच डावलले जात असेल, तर हा अन्याय आहे,” अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी थेट एल्गार करण्याची भूमिका घेतली.






