
Raigad News: सोनं महागलं, तरी खरेदीचा उत्साह कायम! दसऱ्याला रायगडच्या बाजारपेठा फुलल्या, वाहनांचीही विक्री
सोन्याच्या किमती वाढलेल्या असतानाही दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कायम असल्याने बाजारपेठांमध्ये तेजी आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू घरी आणण्यासाठी ग्राहकांनी आधीपासूनच नियोजन केले होते. काहींनी वाहनांचे आगाऊ बुकिंग केले होते, तर काही ग्राहकांनी ऐन मुहूर्तावर खरेदीला प्राधान्य दिले. या खरेदीतून जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त केला. (फोटो सौजन्य – AI Created)
दसऱ्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील विविध वाहनांच्या शोरूममध्ये सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होती. होंडा आणि हिरो दुचाकींना यांसारख्या कंपन्यांच्या ग्राहकांकडून चांगली मागणी मिळाली. दुचाकींच्या तुलनेत चारचाकी वाहनांच्या, विशेषतः कारच्या खरेदीकडेही ग्राहकांचा कल दिसून आला. पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींना अधिक पसंती मिळाली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन कंपन्यांकडून विविध सवलती देण्यात आल्या होत्या. काही ग्राहकांनी रोख रक्कम देऊन, तर काहींनी कर्जाच्या माध्यमातून वाहन खरेदी केले. नवीन वाहन घरी आणल्यानंतर त्याला हार घालून पूजा करण्यात आली. अनेकांनी कुटुंबीयांसमवेत वाहनांसोबत छायाचित्रे आणि सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर केले.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी झाली होती. टीव्ही, फ्रिज, एसी यांसह विविध विजेवर चालणाऱ्या उपकरणांवर दुकानदारांकडून सवलती देण्यात आल्या होत्या. घरासाठी आवश्यक वस्तू खरेदी केल्या. बाजारपेठांमध्ये दसऱ्याच्या दिवशी उत्साह दिसून आला.
दसऱ्याच्या मुहूर्तावर सराफ बाजारातही ग्राहकांची वर्दळ होती. सोन्याच्या वाढत्या किमतींचा काही प्रमाणात परिणाम जाणवला असला, तरी अनेक लोकांनी शुभ प्रसंगी विविध प्रकारचे दागिने लहान असोत वा मोठे खरेदी केले. आर्थिक परिस्थितीनुसार ग्राहकांनी खरेदीला प्राधान्य दिले, त्यामुळे सराफ बाजारातही उत्साहाचे वातावरण होते.