Raigad News: पाताळगंगा नदीकाठच्या तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर पालन; परिसरातील नागरिकांची प्रशासनाकडे तक्रार
माशांना मोठ्या प्रमाणात खाद्य टाकले जात असल्याने त्यातील शिल्लक खाद्य तलावाच्या पाण्यात कुजते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावत असून दुर्गंधी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी तलावातील दुर्गंधीयुक्त पाणी ठराविक कालावधीनंतर नदीपात्रात सोडले जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या आरोपांची संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे स्थानकांचे म्हणणे आहे.
तहसीलदार, मत्स्य विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्तपणे संबंधित तलावांची तातडीने पाहणी करून पाण्याचे नमुने घ्यावेत. तसेच तलाव आणि परिसरातील दुर्गंधी व संभाव्य प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रशासन प्रत्यक्ष पाहणी करून काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पाताळगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबरोबरच नदीकिनारी असलेल्या तलावांमधून होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाचीही तातडीने दखल घेण्यात यावी.
मांगूर माशांना खाद्य म्हणून कोंबड्यांचे टाकाऊ अवशेष वापरले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे खाद्य तलावात कुजल्याने दुर्गंधी वाढत असल्याची तक्रार आहे. तसेच मृत माशाची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता काही ठिकाणी ते जाळले जात असल्याने महड गाव, देवस्थान परिसर, खालापूर तसेच सावरोली पूल परिसरात दुर्गंधीचा त्रास जाणवत असल्याचे नागरिक सांगतात.
Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका
पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर पाताळगंगा बचाव मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष राकेश खराडे यांचा शासन आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर नदीकिनारी असलेल्या तलावांमधील कथित मांगुर पालन, तलावातील पाणी नदीत सोडले जाते का, याची प्रशासनाने सखोल तपासणी करणे आवश्यक आहे.






