
Raigad News: महाडकरांना अखेर मोठा दिलासा! पाणीटंचाई दूर, नियमित पाणीपुरवठा पूर्ववत
सावित्री नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात जलवाहिनी वाहून गेल्यानंतर तिची दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नगरपरिषदेला जवळपास वीस दिवस प्रयत्न करावे लागले होते. त्यानंतर कोथुर्डे धरणाच्या जुन्या जलवाहिनीला वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार गळती लागण्याचे सत्र सुरूच राहिले. एका ठिकाणची गळती दुरुस्त केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी बिघाड होत असल्याने प्रशासनासमोर तांत्रिक आव्हान उभे राहिले होते. ऐन पावसाळ्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. (फोटो सौजन्य – AI Created)
शहरात तांत्रिक अडचणी आणि ८ पूरस्थितीत जलवाहिनी वाहून गेल्यामुळे काही महिन्यांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. या काळात नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पाणी नियोजनासाठी कठोर परिश्रम घेतले. नागरिकांनीही मोठा संयम दाखवून प्रशासन व लोकप्रतिनिधींना सहकार्य केले, त्याबद्दल सर्व जनतेचे मनापासून आभार, यापुढे सुयोग्य जलनियोजनाच्या माध्यमातून आगामी काळात सुरळीत पाणीपुरवठा करण्यावर आमचा भर राहील. – संदीप जाधव, उपनगराध्यक्ष, महाड नगरपरिषद
पाणीटंचाईच्या काळात नगरसेवक आणि नगरसेविकांना नागरिकांच्या नाराजीला देखील सामोरे जावे लागत होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा तसेच प्रभागनिहाय पाणी नियोजनाचे प्रयत्न करण्यात आले. मात्र वाढती मागणी आणि विस्कळीत जलवाहिन्यांमुळे सर्व भागांची गरज पूर्ण करणे कठीण ठरत होते. सर्वच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांत पाणी नियोजनासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांसह नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनाही मोठा दिलासा मिळाला आहे. सुयोग्य जलनियोजन करून शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात येणार आहे.
एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या परिस्थितीत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित भोईर यांची बदली झाल्यानंतर जलवाहिनीच्या गळतीवर शास्त्रोक्त आणि तंत्रशुद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने खोपोली येथील पाणीपुरवठा अभियंता अविनाश भोईर यांची महाडचे प्रभारी अभियंता म्हणून नियुक्त्ती केली.
‘अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही’; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा
यापूर्वी ते महाड नगरपरिषदेत कार्यरत असल्याने आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा अनुभव असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली नगरपरिषद प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर गळती शोधून दुरुस्तीचे काम हाती घेतले, जलवाहिनी जुनी झाल्याने वारंवार गळतीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे ही गळती कायमस्वरूपी रोखणे प्रशासनापुढील मोठे आव्हान होते, मात्र, तांत्रिक पद्धतीने करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे अखेर गळती रोखण्यात यश आले असून, शहराचा पाणीपुरवठा आता पूर्ववत केला.