पर्यटकांचा लाडका प्रवास थांबला! आजपासून माथेरानची मिनी ट्रेन पावसाळी सुट्टीवर; १५ ऑक्टोबरपर्यंत सेवा बंद
संतोष पेरणे, माथेरान : पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन पर्यटनाच्या गर्दीने ओसंडून वाहणार आहे. मात्र नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे १५ जून ते १५ ऑक्टोबर या काळात नारोगेज मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यासाठी मिनीट्रेन बंद केली जाते. त्यानुसार आज १५ जून पासून मिनी ट्रेन पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. पावसाळी हवामान आणि दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेता प्रवाशांची सुरक्षितता यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटिश काळात सुरू झालेली नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन दरवर्षी १५ जुन ते १५ ऑक्टोबर या कालावधीत बंद ठेवली जाते.पर्वतीय रेल्वे मार्ग असल्याने पावसाचा प्रचंड वेग आणि सततचा पाऊस यामुळे दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने मिनीट्रेन बंद असते.मात्र यावर्षी नेरळ माथेरान नेरळ मार्गावरील मिनी ट्रेन आठ दिवस आधीच म्हणजे आठ जुन पासून पावसाळी सुट्टीवर जाणार आहे.सध्या माथेरान मध्ये पर्यटन हंगाम असून पर्यटकांची हजारोंची गर्दी माथेरान मध्ये आहे.असे असताना मध्य रेल्वे प्रशासनाने हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाज नुसार मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालविली जाणारी प्रवासी वाहतूक या हंगामातील शेवटची ट्रेन असणार आहे.सध्या सर्वत्र कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी माथेरान शहरात आहे.त्यात माथेरान आणि मिनी ट्रेन हे मोठे समीकरण असून मिनी ट्रेनची नेरळ माथेरान सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने त्याचा थेट परिणाम माथेरानचे पर्यटन व्यवसायावर होणार आहे.
Matheran News: माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांची पहिली पसंती; हेरिटेज मानांकनाची प्रतीक्षा कायम
मात्र मागील काही वर्षे पावसाळा लवकर सुरू होत असल्याने मिनी ट्रेनच्या नेरळ माथेरान सेवेला लवकर ब्रेक लागला होता.२०३५ मध्ये मे महिन्यात पाऊस सुरू झाला होता आणि त्यावेळी एक जून रोजीच मिनी ट्रेनची नेरळ माथेरान सेवा बंद करावी लागली होती.तर २०२४ मध्ये नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनची सेवा १० जून रोजी स्थगित करण्यात आली होती. यावर्षी अद्याप पाऊस सुरू होण्याचे कोणतेही लक्षण १४ जून पर्यंत दिसून येत नाही.तरीदेखील ब्रिटिश काळापासून सुरू असलेला शिरस्ता कायम ठेवण्यात आला आहे.माथेरान घाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळत असतात आणि त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन १५ जून पासून मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ ही सेवा बंद करण्यात येणार आहे.१५ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ माथेरान नेरळ अशी सेवा बंद करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
१५ जून पासून नेरळ माथेरान नेरळ ही प्रवासी सेवा बंद होणार आहे.मात्र पावसाळ्यात देखील नेरळ माथेरान मार्गावरील माथेरान ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरू राहणार आहे.कीइतिही पाऊस असेल तरी देखील अमन लॉज ते माथेरान या दरम्यान मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू असते. तर नेरळ माथेरान नेरळ मार्गावर प्रवासी वाहतूक बंद असली तरी नेरळ येथून दररोज मालवाहू गाडी सकाळी साडे आठ वाजता माथेरान अमन लॉज येथे सोडली जाणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेने प्रसारित केलेल्या पत्रकातून दिली आहे.
माथेरान येथून अमन लॉज करिता
सकाळी 08.20,09.10,11.35,
दुपारी 02.00,03.15,
सायंकाळी 05.20
शनिवार रविवार दोन अतिरिक्त फेऱ्या
सकाळी 10.05,
दुपारी 01.10
अमन लॉज स्थानकातून माथेरान करिता
सकाळी 08.45,09.35,
दुपारी 12.00,.02.45,03.40, सायंकाळी 05.45
शनिवार रविवार अतिरिक्त फेऱ्या
सकाळी 10.30,दुपारी 01.35






