हॉस्पिटलमध्ये शूटिंगमुळे रुग्ण हैराण? रेवदंडा आरोग्य केंद्राबाबत नागरिकांचा संताप, ओपीडी सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार (फोटो सौजन्य-ChatGPT)
मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणात कलाकार, तांत्रिक कर्मचारी आणि साहित्य आणण्यात आले होते. यामुळे रुग्णालय परिसरात गर्दी निर्माण झाली. काही रुग्णांनी तपासणीसाठी प्रतीक्षा करावी लागल्याची तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अडथळे निर्माण झाल्याची तक्रार केली आहे.
Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल
सरकारी आरोग्य संस्थेत रुग्णसेवेला प्राधान्य देण्याऐवजी चित्रीकरणाला परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना तपासणीसाठी आले असताना त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक आरोग्य केंद्राचे नियमित कामकाज पूर्ण झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेतच चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली होती. रुग्णसेवा सुरू असताना कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती.
डॉ. नेहुलकर म्हणाल्या, “जर ओपीडी सुरू असताना रुग्णांच्या तपासणीस किंवा उपचार प्रक्रियेस बाधा येत असेल तर ते चुकीचे आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास संबंधितांना तत्काळ चित्रीकरण थांबविण्याच्या सूचना दिल्या जातील.” दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि रुग्णांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक चित्रीकरण करताना रुग्णसेवा बाधित होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. आता जिल्हा आरोग्य प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Raigad News : धावत्या बसचं चाक निखळलं अन्… आगार व्यवस्थापकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ






