
Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला
गतवर्षी मुसळधार पावसात तिसे गावात दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे, आमदार अनिकेत तटकरे, रोह्याचे तहसीलदार किशोर देशमुख, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकानेही धोकादायक भागाची पाहणी केली. यावेळी योग्य नियोजन करून संरक्षण भिंत उभारण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते.
मात्र पाहणी आणि आश्वासनानंतरही कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. पावसाचा जोर वाढला की दरड कोसळण्याची भीती निर्माण होत असून, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. उमाजी गणपत गोरीवले, सुनील पांडुरंग शिगवण यांच्यासह अनेक ग्रामस्थांची घरे या धोकादायक परिसरात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना सतत भीतीच्या वातावरणात राहावे लागत आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठविण्यात आला असला तरी त्याला मान्यता मिळून प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे. दरडप्रवण गाव म्हणून घोषित झालेल्या तिसेतील ग्रामस्थांचा प्रश्न केवळ एका संरक्षण भिंतीपुरता मर्यादित नसून तो थेट त्यांच्या जीविताच्या सुरक्षेशी संबंधित आहे. पाहणी झाली, प्रस्ताव गेला, आश्वासनही मिळाले; आता तिसे ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे ती केवळ संरक्षण भिंतीच्या प्रत्यक्ष कामाची.
दरडीचा धोका आम्ही गेल्या दोन वर्षांपासून सहन करीत आहोत. अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक पाहणी करून गेले आहे. संरक्षण भिंत उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यात आमच्या जीवाला आणि घरांना धोका आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन काम सुरू करावे.- उमेश पांडुरंग शिगवण, ग्रामस्थ
संरक्षण भिंतीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात येईल.- ज्ञानेश्वर खुटवड, प्रांताधिकारी, रोहा