इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत
मराठी माणसाची प्रगतीव सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक योगदान तसेच देशाच्या राजकारणातील ऐतिहासिक स्थान अधोरेखित करणारा तसेच हा देखावा आहे. या देखाव्यात इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानातील सामाजिक परिस्थिती यांचा सुरेख मेळ साधला गेला आहे
लेखक, साहित्यिक, गायक, कलाकार तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठी व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमा आणि फ्रेम्सच्या या देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत. या देखाव्यात मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यात आला आहे.
गेली 34 वर्षे हनुमान क्रीडा मंडळाच्या साखरचौथ गणपती उत्सवाचे हे 34 वे वर्ष आहे.विशेष म्हणजे गेल्या तीन पिढ्यांपासून मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या एकजुटीने हा गणेश उत्सव साजरा करतात त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवर जनजागृती करतात. याला एक व्यासपीठ म्हणूनही या उत्सवाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विविध क्षेत्रांतील मराठी कर्तृत्वाचा जागर या वर्षीच्या देखाव्यात चित्रपट, नाट्य, साहित्य, शिक्षण, कला, संस्कृती, उद्योग आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत मराठी माणसाने केलेल्या उल्लेखनीय वाटचालीचे दर्शन घडविण्यात आले आहे.
माध्यमातून बुद्धिमत्ता, कष्ट, कल्पकता आणि नेतृत्वाच्या जोरावर मराठी समाजाने निर्माण केलेले स्थान अधोरेखित करण्यात आले आहे.
‘मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात गेला तरी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवू शकतो’, हा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. मराठी माणसाचे पाऊल सातत्याने प्रगतीच्या दिशेने पुढे पडावे, अशी भावना या संकल्पनेमागे असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
‘दिल्लीचे तख्त राखते’पासून ‘शेवटी मधान्द तख्त फोडते मराठी’पर्यंत व्यंग मराठ्यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा संदर्भ देताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुढील काळातील मराठा सत्तेच्या विस्ताराची ऐतिहासिक पार्श्वभूमी देखाव्यात मांडण्यात आली आहे. दक्षिणेपासून उत्तर भारतापर्यंत मराठा सत्तेचा झालेला विस्तार आणि दिल्लीच्या राजकारणातील मराठ्यांची भूमिका याची आठवण या माध्यमातून करून देण्यात आली आहे.
याच ऐतिहासिक संदर्भाला वर्तमान परिस्थितीशी जोडताना ‘शेवटी मधान्द तख्त फोडते मराठी’ असे उपहासात्मक वाक्यही देखाव्यात मांडण्यात आले आहे. इतिहासातील मराठ्यांच्या प्रभावाची आणि आजच्या काळातील मराठी भाषा व मराठी माणसासमोरील आव्हानांची सांगड घालत या व्यंगातून सामाजिक भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न देखाव्याची सजावट करणारे विनीत तांडेल यांनी मराठी अस्मिता, इतिहास आणि वर्तमानातील मराठी समाजाची वाटचाल या तिन्ही बाबींचा विचार करून देखावा साकारला आहे. इतिहासात मराठी माणसाने पराक्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्याचवेळी आज मराठी भाषा आणि संस्कृतीसमोरील आव्हानांकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता यांचे जतन करणे ही केवळ एका पिढीची जबाबदारी नसून हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.
साखरचौथ गणपतीच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धेबरोबरच इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा संगम साधणारा हा देखावा बोरी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगत आधुनिक क्षेत्रांतही नव्या पिढीने पुढे जावे आणि मराठी अस्मिता जपत प्रगतीची वाटचाल करावी, अशी अपेक्षा या देखाव्यातून व्यक्त करण्यात आली आहे. तीन पिढ्यांची एकजूट 34 वर्षांची उत्सव परंपरा आणि मराठी अस्मितेचा जागर यामुळे बोरीतील हनुमान क्रीडा मंडळाचा साखरचौथ गणपती उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता इतिहास, संस्कृती, कर्तृत्व आणि सामाजिक जाणिवेचा जागर करणारा उत्सव ठरत आहे.






