
Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा
अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी सरकार आणि महावितरणवर टीका केली. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, तालुका चिटणीस सुरेश घरत आदी उपस्थित होते. (फोटो सौजन्य – AI Created)
स्मार्ट मीटरसह संपूर्ण योजनेसाठी ३९,६०२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याचे शेकापने नमूद केले. या खर्चातील ६०% रक्कम केंद्राकडून अनुदान, उर्वरित ४०% रक्कम महावितरण कर्जाच्या माध्यमातून उभारणार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. महावितरणच्या कर्जाची परतफेड व्याजासह केली जाणार असल्यास त्याचा अंतिम आर्थिक भार ग्राहकांवर किती पडणार? राज्य सरकारचा आर्थिक वाटा किती? याचा हिशेबची मागणी केली.
भांडुप, कल्याण, कोकण, बारामती आणि पुणे या भागातील स्मार्ट मीटरच्या कामासाठी अदानी एनर्जी सोल्युशन्सला सुमारे १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आल्याचे शेकापने म्हटले आहे. मात्र, त्यानंतर ही रक्कम जवळपास २७, ७४० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे. मूळ निविदेतील रक्कम आणि सुधारित मंजूर रकमेतील एवढी मोठी तफावत का निर्माण झाली? स्मार्ट मीटर बसविण्याचा खर्च अचानक वाढण्यामागचे कारण काय? या वाढीची जबाबदारी कोणाची? याचा सरकारने खुलासा करावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
स्मार्ट मीटरमुळे पारंपरिक मीटर रीडिंग आणि घरपोच बिल वितरणाची कामे कमी होण्याची शक्यता असल्याने कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या स्थानिक तरुणांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो, असा दावा शेकापने केला आहे. या योजनेमुळे सुमारे २५ हजार तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
स्मार्ट मीटरबाबत सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर महावितरण आणि संबंधित कंपन्यांच्या कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा शेकापने दिला आहे. ऑक्टोबरमध्ये स्मार्ट – मीटरविरोधात मोठे आंदोलन करण्याची भूमिका पक्षाने जाहीर केली असून, त्यापूर्वी गावागावात – लोकजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन