येत्या आठ दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा..., रामदास कदम यांचा संजय कदमांना इशारा
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांची चौकशी सुरू आहे. त्यासोबत रामदास कदम यांचीही चौकशी व्हावी, असा थेट आरोप माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन नेहमीच्या शैलीत जोरदार पलटवार केला आहे. उभ्या आयुष्यात मी कधीही स्वतःच्या अंगावर एक डाग लावून घेतलेला नाही. प्रसार माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना पत्रकारांनी एकतरी पुरावा आहे का? अशी खात्री करून घ्यायला हवी.
प्रदूषण नियंत्रण मंडळ हे शासन नियुक्त केलेले प्रतिनिधी चालवतात, त्यामुळे पर्यावरण मंत्र्यांचा त्यांच्या बदलीशी काडीचाही संबंध येत नाही. सातत्याने सरकारमधील मंत्री दीपक केसरकर व इतरांवर बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. संजय कदम यांनी यापूर्वी सुध्दा अशीच बदनामी केली होती. त्याच्या तीन केसेस न्यायालयात दाखल केलेल्या आहेत. त्यांनी पुन्हा बदनामी केली असून येत्या आठ दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ बदनाम करण्याचे कटकारस्थान संजय कदम आणि काही मंडळी करीत आहेत.