गोंदिया : शिशिर ऋतुच्या काळात पानगळ होऊन झाडांना मरगळ आल्याचा भास होतो. अशातच वसंत ऋतूचे आगमन होऊन झाडांना नवी पालवी फुटू लागते. हा ऋतुबदल चैत्र महिन्यात घडतो. याच कालावधीत जंगलात आंबा, टेंभर, चारोळी, कवठ, बोर आदी निसर्गाचा गोडवा असलेली फळे पूर्वी बाजारात विक्रीला यायची. परंतु, बदलत्या जीवनमानामुळे या जंगली फळांची जागा आता इतर देखण्या फळांनी घेतली आहे. त्यामुळे हा रानमेवा लुप्त होऊन भावी पिढीला त्याचा गोडवा चाखता येणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भाग हा निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. येथील रानावनात बहुपयोगी विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतीसह रानातील मेवा असलेली विविध फळे आहेत. त्यात चारोळी, बोर, टेंबर, कवळ, आवळा, चिंचा इत्यादी जंगली फळे आहेत. ही फळे काही वर्षांपूर्वी बाजारात विक्रीला येत होती. ग्रामीण भागातील महिलांचा तो व्यवसाय असायचा. त्यातून मोठी मिळकतही होत होती. परंतु, आज होणारी जंगलतोड, जंगली जनावरांचा वावर, सोबतच सुधारित जातीचे विदेशी आकर्षक फळे बाजारात उपलब्ध असल्याने या रानमेव्याकडे दुर्लक्ष होत आहे. मोठ्या मेहनतीने ही फळे आणली तरी, आज बाजारात विविध देखणी फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने या फळाकडे कुणी लक्ष देण्यास तयार नाही.
शहरात सोन्याचा भाव, कष्टकरी अनभिज्ञ
चारोळी, बिब्बा या रानमेव्याला शहरातील मॉलमध्ये सोन्यासारखा भाव आहे. मात्र, जो आदिवासी बांधव हा रानमेवा गोळा करतो, त्याचा कच्चा माल मातीमोल भावात घेतला जातो. बाजारपेठेची अनुपलब्धता, व्यवहाराची अनभिज्ञता यामुळेच हे शोषण होत आहे. हायटेक जीवनमानाच्या ओघात निसर्गाचे देणे असलेला रानमेवा दूर सारला जात आहे. हा लज्जतदार रानमेवा आता मिळणे कठीण झाले आहे. तर, भावी पिढीला त्याची चवच महिती नसणार आहे. या रानमेव्यास पूर्वीचे भरभराटीचे दिवस येणे गरजेचे आहे.