फोटो सौजन्य: iStock
आंचल मदन सकपाळ असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. हे कुटुंब मुंबई–कल्याण परिसरातून दापोलीत पर्यटनासाठी आले होते. मागील तीन ते चार दिवस ते दापोली परिसरात पर्यटनाचा आनंद घेत होते आणि परतीच्या प्रवासासाठी आंजर्ले येथील एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होते.
सकाळी परतीसाठी निघायचे असल्याने कुटुंबीयांनी आंचलला उठवण्यासाठी खोलीत गेले असता ती प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिचे शरीर थंड पडलेले होते आणि दातखिळी बसलेली दिसून आली. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तात्काळ स्थानिकांच्या मदतीने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारांसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंचलला मृत घोषित केले.
दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव यांनीही उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. आंचलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार हा मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असून, या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
ठाकरे बंधू एकत्र येण्याने मुंबईत कोणताही परिणाम होणार नाही! मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे वक्तव्य
या दुर्दैवी घटनेमुळे सकपाळ कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आंचल ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील सेंट थॉमस विद्यालयात इयत्ता ८वीमध्ये शिकत होती. ती सकपाळ कुटुंबाची एकुलती एक लाडकी सुकन्या होती.
घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका प्रिती शिर्के, दापोली नगरपंचायतचे अभियंता सुनील सावके, निवृत्त शिक्षक रमाकांत शिगवण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.






