रत्नागिरीमध्ये एअरपोर्ट होणार (फोटो- istockphoto)
रत्नागिरीतून लवकरच टेकऑफ होणार
अनेक दशकांचे स्वप्न साकारणार
विमानतळ प्रकल्प अंतिम टप्यात
रत्नागिरी: रत्नागिरीकरांचे अनेक दशकांचे स्वप्न आता वास्तवात उतरण्याच्या उंबरठ्यावर आहे. कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा रत्नागिरी विमानतळ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या मे २०२६ मध्ये रत्नागिरीच्या आकाशात विमानांची घरघर ऐकू येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय पातळीवर आणि प्रत्यक्ष घटनास्थळी सुरू असलेला कामाचा वेग पाहता हा प्रकल्प रत्नागिरीच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची देणारा ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मे महिन्यामध्ये इमारतीचा लोकार्पण सोहळा होईल, अशी माहिती या आधीच पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
मुंबई ते रत्नागिरी ३२६ किलोमीटर अंतर असून रस्तेमार्गाने यासाठी ७ ते ८ तास लागतात. त्यातही मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवासाचा वेळ अधिक वाढतो. मात्र रत्नागिरीत विमानतळ सुरू झाल्यानंतर प्रवाशांना एका तासाच्या आत रत्नागिरीत पोहोचता येणार आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकरांना मे महिन्यात झेपवणाऱ्या विमानांची प्रतीक्षा आहे… प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सुमारे २०० निष्णात कामगार आणि २० अनुभवी अभियंते दोन पाळ्यांमध्ये काम करत आहेत. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. तीन महिन्यांपूर्वीच विमानतळाच्या कामाच्या प्रगतीची पाहणी पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांसह केली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले होते की कामाचा वेग कंत्राटदाराने अशा पद्धतीने ठेवावा येत्या मे महिन्यात रत्नागिरीच्या या विमानतळावरून विमाने झेपावतील.
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पालकमंत्रा सामंत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच टर्मिनलचे संपूर्ण कामा एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होऊन मे महिन्यातच रत्नागिरी येथून विमाने विविध शहरांकडे जाण्यासाठी आकाशात झेपा घेतील, असे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार, एप्रिल अखेरपर्यंत सर्व तांत्रिक आणि बांधकामा प्रक्रिया पूर्ण करून मे महिन्यात पहिले व्यावसायिक उड्डाण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या कमालीच्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राम नवमीचा मुहूर्तावर ‘या’ आंतरराष्ट्रीय विमानतळा’चे होणार उद्घाटन; पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण
नामांकित कंपन्यांकडे विविध कामांचे विभाजन
प्रकल्पाची जटिलता लक्षात घेऊन शासनाने कामाचे विभाजन विविध नामांकित कंपन्यांमध्ये केले आहे. मुख्य इमारत काम ‘न्याती कंपनी’कडे सोपवण्यात आले आहे. विमानतळाच्या अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी एस. एस. पाटील कंपनीकडे आहे. सध्या रस्त्यांचे सपाटीकरण वेगाने सुरू असून, लवकरच डांबरीकरणाचा अंतिम थर टाकला जाणार आहे.






