खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
पुलाच्या नदीपात्रातील सहा पिअर तसेच दोन्ही बाजूंच्या दोन अॅबटमेंटचे काम पूर्ण झाले आहे. नदीपात्रात काम करताना पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह आणि वाढणारी पातळी हे मोठे आव्हान असते. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्याने प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.
नदीतील तीन स्पॅनसाठी आवश्यक असलेल्या एकूण १२ गर्डरचे लाँचिंगदेखील पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पुलाच्या संपूर्ण सबस्ट्रक्चरचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गर्डर लाँचिंग पूर्ण झाल्यानंतर आता तीनही स्पॅनवर डेक स्लॅबचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचवेळी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या अॅप्रोच रोडचे कामही हाती घेण्यात आले आहे. मुख्य पूल आणि जोडरस्त्यांची कामे समांतरपणे सुरू असल्याने प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
पुलाची मजबुती आणि दीर्घकालीन टिकाऊपणा लक्षात घेऊन बांधकामात ‘Prestressing’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रत्येक टप्प्यावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया आणि गुणवत्तेची काळजी घेतली जात असून, केवळ काम लवकर पूर्ण करण्याऐवजी सुरक्षित आणि दर्जेदार बांधकामावर भर दिला जात आहे.
सध्या पावसाळ्यामुळे नदीपात्रात पाणी असल्याने काही कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. पाण्याची पातळी आणि प्रवाहाचा अंदाज घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करावे लागत आहे. पावसाळा संपल्यानंतर परिस्थिती अनुकूल होताच उर्वरित कामांना अधिक वेग दिला जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
फाउंडेशन आणि सबस्ट्रक्चरची महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने आता जानेवारीपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. डेक स्लॅब, अॅप्रोच रोड आणि अन्य आवश्यक कामे नियोजनानुसार पूर्ण झाल्यास जानेवारीपर्यंत खडपोली पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव






