२५६ प्रकारची झाडे लावून कळंबस्तेत साकारत आहे 'देवराई'
चिपळूण: प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या संकल्पनेतून आणि सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या प्रमुख सहकार्याने लोकसहभागातून कळंबस्ते येथे २५६ जातींची झाडे असणारी देवराई उभी केली जात आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाचा शुभारंभ झाला होता, तर यंदा पावसाळ्यानंतर देवराई उभारणीच्या कामाला गती मिळाली आहे.
रविवारी मंडणगड येथे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर आलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आणि उपक्रमाचे कौतुक केले. या देवराई प्रकल्पांतर्गत २५६ प्रजातींच्या तब्बल १ हजार २५२ झाडांचे रोपण करण्यात आले आहे. स्थानिक व दुर्मिळ वनस्पतींचा समावेश असलेल्या या ठिकाणी सीएसआर निधीतून प्रकल्प उभारण्यात आला असून, स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षसंवर्धनाचे काम सुरू आहे.
या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी वैदेही रानडे यांना प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील, नायब तहसीलदार एस. एफ. साळुंखे, सर्कल उमेश राजेशिर्के, कृषी विस्तार अधिकारी बी. बी. पाटील, तलाठी सतीश जाधव, खेर्डीचे तलाठी अलीमिया सय्यद, खंडेराव कोकाटे, मंडळ अधिकारी नारायण चौधर, महसूल सहाय्यक सुनील राणे तसेच सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या ठिकाणी वैदेही रानडे आणि उमा घारगे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वैदेही रानडे यांनी प्रकल्पाचे कौतुक करताना सांगितले की, “निसर्गसंवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. अशा प्रकल्पांमुळे पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांमध्ये वृक्षप्रेमाची भावना वाढीस लागते.”
सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे यांनी वैदेही रानडे आणि उमा घारगे पाटील यांना प्लास्टिकपासून तयार केलेल्या रिसायकल पर्स भेट दिल्या. त्यांनी संस्थेच्या ‘प्लास्टिक मुक्ती मोहिमे’बाबत सविस्तर माहिती दिली. यावर प्रतिक्रिया देताना वैदेही रानडे म्हणाल्या, “आम्ही रत्नागिरीत प्रत्यक्ष भेट देऊ आणि प्लास्टिक मुक्तीसाठी आणखी काही वेगळे उपक्रम राबवता येतील का, याचा विचार करू.”
कळंबस्ते येथील देवराई प्रकल्पामुळे स्थानिक पर्यावरणीय संतुलन राखण्यास, जैवविविधतेचे जतन करण्यास आणि नागरिकांमध्ये वृक्षप्रेम जागृत करण्यास मोठी मदत होणार आहे. हा उपक्रम कोकणातील पर्यावरणपूरक चळवळीचा प्रेरणादायी नमुना ठरत आहे.