महायुतीबाबतचा अंतिम निर्णय आता वरिष्ठ नेत्यांकडे
चिपळूण (प्रतिनिधी): येत्या चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले की, महायुतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यावा, मात्र युती झाली नाही तरी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्ण तयार आहे, असे ठाम मत मांडण्यात आले.
बैठकीत आ. शेखर निकम यांनी सांगितले की, इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाकडे मागवले जातील. त्याकरिता एक पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करण्यात येणार असून, या बोर्डाचे प्रमुख प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम असतील. नगर परिषदेच्या विकास कामांचा विचार केला, तर परिषद आपल्या ताब्यात घेण्यात पक्षाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या सुरुवातीला बँकेचे चेअरमन संजयशेठ रेडीज व इतर दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधही एकमताने करण्यात आला. यानंतर आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पक्षातील कार्यकर्त्यांनी उत्साहाने काम करत नागरिकांशी थेट संवाद साधावा. “बॅनर लावून पक्ष मोठा होत नाही, घराघरांत संपर्क साधल्यानेच जनतेचा विश्वास जिंकता येतो,” असे आवाहन त्यांनी केले.
प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून निवडणुकीत पेटून उठावे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता पक्षाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी सांगितले की, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. सर्वांनी एकजुटीने आणि झटून काम केल्यास नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे शक्य आहे. या बैठकीत प्रांतिक सरचिटणीस जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष उदय ओतारी यांनी केले.
चिपळूण नगर परिषदेतील १४ प्रभागांचा सविस्तर आढावा कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला. या बैठकीस माजी सभापती पूजा निकम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश कदम, रेहाना बिजले, जाकिरभाई शेख, आसन रफिकभाई सुर्वे, सलीम पालोजी, विकास गमरे, आदित्य देशपांडे, किशोर रेडीज, मनोज जाधव, सचिन पाटेकर, सचिन साडविलकर, शिवानी पवार, वर्षा जागुष्टे, फैरोजा मोडक, विनायक पवार, डॉ. राकेश चाळके, दिशाताई दाभोळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिपळूण शहराध्यक्ष योगेश पवार, माजी नगरसेवक बिलाल पालकर, विशाल जान वलकर, नसरिन खडस, संदीप चिपळूणकर, खालीद दाभोलकर, बरकत पाते, इम्रान खतीब, अनिकेत यादव, वैभव रेडीज यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Ratnagiri News : चिपळूण न्यायालयाचे स्थलांतर करू नये; भाजप चिपळूण उपविभागीय अधिकारी यांना निवेदन