Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शनिवारी दुपारच्या सुमारास बल्लारशाहा काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक ५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ जवळ बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहीती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत बिबट्याचे वय ४ ते ५ वर्षाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पंचनामा करून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल अद्याप प्राप्त नसल्याची नोंद प्राथमिक कागदपत्रात असली, तरी मृत्यूचे प्राथमिक कारण स्पष्ट करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
रेल्वेच्या जबर धडकेमुळे बिबट्याच्या डोक्याला झालेल्या तीव्र आघातातून न्यूरोलॉजिकल शॉक निर्माण झाला आणि त्यातून बिबट्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे. शवविच्छेदनाची नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृत बिबट्याचे शव मध्यवर्ती रोपवाटिका, सुमठाणा येथे नेण्यात आले. वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियमानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे रेल्वे मार्गालगतच्या वन्यजीव सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर वन्यप्राण्यांची ये-जा होत असताना अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्यमान प्रतिबंधात्मक यंत्रणा कितपत सक्षम आहे.
वन्यप्राण्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर पंचनामा, शवविच्छेदन आणि मृतदेहाची विल्हेवाट ही प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, भविष्यात याच मार्गावर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय केल्या जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दक्षिण मध्य रेल्वे आणि वनविभागाने बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गांचा संयुक्त अभ्यास करून वन्यजीवांच्या हालचालींचे ‘हॉटस्पॉट’ निश्चित करणे आवश्यक आहे. गरजेनुसार सुरक्षित वन्यजीव मार्ग, अंडरपास अथवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा विचार करणे गरजेचे झाले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि वनविभागाने संयुक्तपणे ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवन क्षेत्रातील आलेसूर येथे गावातील नंदू मेश्राम यांच्या गोठ्यात शिरून तीन शेळ्या ठार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेमुळे आलेसूर परिसरात दहशत पसरली आहे. नंदू मेश्राम यांच्या घराशेजारी गोठ्यात बिबट्याने रात्री प्रवेश करून बांधून असलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. यात ३ शेळ्या जागीच ठार झाल्या. मेश्राम यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आलेसूर गावात बिबट्याचा वावर वाढला आहे. या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे.






