फोटो सौजन्य- प्रतिनिधी
चिपळूण (प्रतिनिधी):– चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. शेखर निकम यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ), शिवसेना ( शिंदे गट), भाजप व घटक पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जनतेच्या उपस्थितीने गर्दीचा उच्चांक गाठला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चिपळूणच्या इतिहासात सर्वात मोठ्या गर्दीची नोंद झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गटाला) चिपळूण- संगमेश्वर विधानसभेची जागा मिळाली. विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या नावाची महायुतीतर्फे घोषणा झाली. तर सोमवारी वसुबारसेच्या शुभ मुहूर्तावर निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दोनच दिवसांपूर्वी घोषणा केली होती.
महायुतीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते डेरेदाखल!
यानुसार सोमवारी सकाळी चिपळूणमध्ये सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना-भाजप महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने डेरेदाखल होण्यास सुरुवात झाली होती. तत्पूर्वी सकाळी आ. शेखर निकम यांनी कुटुंबीयांसमवेत सावर्डे येथे स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. नंतर अलोट गर्दीच्या रॅलीने चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र जवळील व नगर परिषदेसमोरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
….सह्याद्रीचा वाघ आला!
या रॅलीदरम्यान ‘कोण आला रे कोण आला, सह्याद्रीचा वाघ आला’, ‘आमदार शेखर निकम यांचा विजय असो’, ‘महायुतीचा विजय असो’, ‘शेखर निकम सर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. खालू, रतीब, डीजे, ढोल, ताशांच्या गजराने परिसर दणाणून गेल्याचे पहावयास मिळाले. तर शाहिरी पोवाडाच्या माध्यमातून निकम यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला गेला. तसेच वारकरी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी वाहनातून आमदार निकम यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जनतेला नमस्कार करीत आशीर्वाद मागितले.
ही रॅली चिपळूण प्रांत कार्यालयाजवळ पोहोचताच आ. शेखर निकम यांनी महायुतीच्या नेत्यांसमवेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
गर्दी पाहून भारावून गेलो-आ. शेखर निकम
महायुती तर्फे आपण उमेदवारी अर्ज भरत असताना महायुतीचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेची गर्दी पाहून आपण भारावून गेलो आहोत, अशी प्रतिक्रिया देताना या सर्वांच्या जोरावर आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच गेल्या पाच वर्षातील विकास कामांचा आढावा घेत असताना निवडणुकीत आपण आपली कामे जनतेपर्यंत पोहोचवायची आणि या जोरावरच आपण आपला विजय खेचून आणायचा, अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना दिली. तर उपस्थित गर्दीला मार्गदर्शन करताना आपल्या खंबीर साथीची गरज असल्याची भावनिक साद घातली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे, शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती सौ. पूजा निकम, भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य दादा साळवी, शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, प्रमोद अधठराव, राष्ट्रवादीचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, गुलाब सुर्वे, प्रकाश राजेशिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. जागृती शिंदे, विधानसभा क्षेत्राध्यक्षा सौ. मनाली जाधव, शहराध्यक्षा सौ. आदिती देशपांडे, माजी नगरसेवक-नगरसेविका, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.