विकास कामे मतदारांपर्यंत पोहोचवल्याने निवडणुकीत यश;आमदार शेखर निकम याचं वक्तव्य
चिपळूण (प्रतिनिधी):--चिपळूणमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या समारंभात आमदार शेखर निकम यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. निकम म्हणाले की, आपण पहिल्यापासूनच सांगत होतो की ही निवडणूक आव्हानात्मक आहे. त्याची कारण देखील अनेक आहेत. अशाही स्थितीत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपली विकासकामे महायुतीचे सर्वच कार्यकर्ते मतदारापर्यंत घेऊन गेले. त्यांच्या या मेहनतीमुळेच आव्हानात्मक असलेल्या या निवडणुकीत आपला विजय प्राप्त झाला आहे, असं मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले. शहरातील राधाताई लाड सभागृहात शनिवारी महायुती नियोजन समिती व हितचिंतक यांचे आभार व सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
शेखर निकम पुढे असंही म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतधिक्याबाबत बोलत असताना प्रत्येक निवडणुक ही वेगळी असते. प्रत्येक निवडणूकीत संकल्प वेगळे असतात. मी पहिल्यापासून सांगत होतो की, ही निवडणूक आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. त्याची कारणं अनेक आहेत. कारण निवडणुकीत समोरचा उमेदवार देखील त्याच ताकदीने उतरत असतो. अशाही स्थितीत तुम्ही सर्व जण ठाम राहून निवडणुकीत आपल्या विकास कामाच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचलात त्यामुळेच हे यश मिळू शकले. निवडणुकीत मिळालेल्या कमी मताधिक्याविषयी हेवे दावे करत बसण्यापेक्षा आपण आपलं काम करत आपल्या बाबी लोकापर्यंत घेऊन गेले पाहिजे. चिपळूण शहराने २०१९ च्या निवडणुकीत ८ हजारांचे मताधिक्य दिले होतं. त्याची जाणीव आपल्याला आहे. आताची परिस्थिती वेगळी होती माझ्या बद्दल काही समज गैरसमज पसरवण्याच काम झाल होतं. अशाही स्थितीत चिपळूण शहराने जी साथ दिली यात मिळालेल्या विजयात या शहराचा वाटा महत्वाचा आहे. माझ्या गावात कोट्यावधीची कामे करुन देखील मताधिक्य कमी झाले याची कारणे शोधली पाहिजेत. अशाही स्थितीत जे सकारात्मक आहे, ते पुढे घेऊन जाण्याची आपली भुमिका ठरवली पाहिजे. निवडणुका झाल्या आता अडीच वर्षानंतर मंत्रीपद मिळेल. या सर्व जर तरच्या गोष्टी असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
आता पुढे कार्यकर्त्यांची म्हणजेच नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक येत असून त्यात महायुती म्हणून आपण एकत्र राहिले पाहिजे. महायुतीच्या वरिष्ठस्तरावरील सर्वच पदाधिकायांना विश्वासात घेऊन संपूर्ण जिह्यात हा महायुतीचा पॅटर्न राबवण्याची गरजेचे आहे. आपण सर्वांनी एकच लक्षात घेतले पाहिजे की, आपला महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल, कारण परिस्थिती कशी असेल कशा पध्दतीचे असले हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. जसे आमदारकीच्या वेळी महायुतीचा उमेदवार निवडूण आणलात, त्यापध्दतीने कोणतीही कुजबुज न करता जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याचा आपला प्रयत्न हवा. कारण नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती जर का आपल्याकडे आल्या तरच मंत्रीपदाची स्वप्न बघायला हरकत नाही. त्यासाठी आपण एकत्रपणे काम केले तर हे शक्य आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण मागे आहोत तेथे आत्मचिंतन करुन तिथे तिथे सुधारणा केली पाहिजे. त्यासाठी त्याची तयारी आतापासूनच केली पाहिजे. महायुतीच्या कार्यकर्त्यांना आपली विनंती राहिल की, ज्यांना कुणाला उभे राहयचे आहे कारण इच्छा प्रत्येकांची असणार आहे. त्यांनी आतापासूनच कामाला लागल पाहिजे. शिवाय आपला स्पर्धक असला तरी त्याला नमस्कार करण्याची भुमिका ठेवली पाहिजे. निश्चितपणे यातून आपल्याला यश मिळेल. आपल्याला जेवढी प्रामाणिकपणाने कामे करता आली तेवढी केली. यापुढेही ती करत राहणार, चिपळूण शहर पूरमुक्त, तलाव, ग्रॅव्हीटी योजना, पर्यटन, क्रीडा, कला, पाझर तलाव, पाणी योजना, यासारखी कामे आपल्या मतदार संघात करायची आहेत. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही त्याची ग्वाही देतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, माजी आमदार विनय नातू यांनी देखील आपले मत मांडले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, चिपळूण तालुकाध्यक्ष नितिन ठसाळे, शिवसेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगरसेवक विजय चितळे, आरपीआयचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, भाजपचे नेते रामदास राणे, माजी सभापती पूजा निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक किशोर रेडीजे, जयंद्रथ खताते, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कदम,राम शिंदे, सुरेश खापले, साधना बोत्रे, आदीती देशपांडे, मिलिंद कापडी आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.