सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पुणे शहरातील आठ मतदारसंघापैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. पर्वती, कसबा, शिवाजीनगर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील काॅंग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे बंडखाेर उमेदवारांनी माघार न घेतल्याने आघाडीसमाेर चिंता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे काॅंग्रेसमधील बंडखाेरांची मनधरणी करताना स्थानिक नेत्यांची दमछाक झाली हाेती. त्यांचे तीन बंडखाेर उमेदवार रिंगणात आहेत.
पर्वती विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या वाटणीत काॅंग्रेसला मिळावा, अशी मागणी काॅंग्रेसचे पदाधिकारी आबा बागुल हे करीत हाेते. परंतु, ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला मिळाली. या ठिकाणी त्यांच्या अश्विनी कदम या उमेदवार आहेत. बागुल यांनी कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वीच उमेदवारी अर्ज दाखल करून भुमिका स्पष्ट केली हाेती. बागुल यांनी माघार घ्यावी यासाठी काॅंग्रेसचे स्थानिक नेते सातत्याने प्रयत्न करीत हाेते. परंतु, त्यांना यश मिळाले नाही. माजी खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह प्रदेशपातळीवरील नेत्यांनी बागुल यांच्याशी संपर्क साधून समजुत काढण्याचा प्रयत्न केला हाेता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नेत्यांकडून बागुल यांच्याशी संपर्क साधला गेला परंतु बागुल हे ठाम असल्याने त्यांनी अर्ज कायम ठेवला.
पर्वती मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी सचिन तावरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी उमेदवारी माघारी घेण्याची तयारी दाखविली, परंतु ते निर्धारीत वेळेत निवडणुक कार्यालयात न पाेहचल्याने त्यांची उमेदवारी कायम राहीली आहे. यामुळे पर्वतीमधील महािवकास आघाडीच्या उमेदवाराची चिंता वाढली आहे.
कसब्यात कमल व्यवहारे यांची बंडखाेरी
पुण्याच्या माजी महापाैर कमल व्यवहारे यांनी कसबा मतदारसंघातून काॅंग्रेसकडे उमेदवारी मागितली हाेती. परंतु, विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या व्यवहारे यांनी अपक्ष निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. आपण निवडणुक लढविणारच असल्याने माझ्याशी संपर्क साधू नका, असे त्यांनी स्थानिक नेत्यांना स्पष्ट सांगितले हाेते. याच मतदारसंघातून माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज दाखल केला हाेता. त्यांची समजुत काढण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले. परंतु व्यवहारे यांची बंडखाेरी थाेपविण्यात अपयश आल्याने महाविकास आघाडीसमाेर मतविभाजन टाळण्याचे आव्हान असेल.
शिवाजीनगरमध्ये मनिष आनंद यांची बंडखाेरी
खडकी कॅन्टाेन्मेट बाेर्डाचे माजी उपाध्यक्ष मनिष आनंद यांनी शिवाजीनगर मतदारसंघातील अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. या मतदारसंघात काॅंग्रेसचे दत्ता बहीरट हे उमेदवार आहेत. या मतदारसंघातून काॅंग्रेसचे बहीरट, मनिष आनंद, माजी आमदार दिप्ती चवधरी हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार मानले जात हाेते. यातिघांचे एकत्रित छायाचित्र अनेक कार्यक्रमात दिसत हाेते. या तिघांनी पक्षाबाहेरील उमेदवाराला संधी देऊ नका अशी भुमिका घेतली हाेती. परंतु बहीरट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनिष आनंद यांनी बंडखाेरी जाहीर केली. मनिष आनंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु स्थानिक नेत्यांनी हात टेकले.
हडपसरमध्ये बधे यांची बंडखाेरी
हडपसर विधानसभा मतदारसंघ ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळेल अशी अपेक्षा शिवसैनिक बाळगुन हाेते. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून माजी महापाैर प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली गेली. या मतदारसंघातुन शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, पदाधिकारी गंगाधर बधे हे देखील इच्छुक हाेते. बाबर यांनी बंडखाेरी केली नाही, मात्र बधे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यात यश आले नाही. बधे हे माळी समाजाचे असुन, महायुती आणि महाविकास आघाडीचे दाेन्ही उमेदवार मराठा समाजाचे असल्यामुळे या मतदारसंघातील मराठा समाजाच्या मतांची विभागणी हाेईल. माळी समाज आपल्याबराेबर राहील , त्याचा फायदा हाेईल असा विश्वास बधे यांना आहे.
महायुतीच्या बंडखाेरांचे अर्ज मागे
महायुतीमध्ये भाजपमध्ये पुणे कॅन्टाेन्मेट मतदारसंघातून भाजपचे माजी नगरसेवक डाॅ. भरत वैरागे आणि शिवाजीनगर मतदारसंघातून मधुकर मुसळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.






