नीरा नदीवर उभारणार २५ कोटींचा पूल! कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
बारामती / प्रतिनिधी : इंदापूर आणि माळशिरस या दोन तालुक्यांतील दळणवळणाचा महत्त्वाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. निमसाखर (ता. इंदापूर) आणि बांगर्डे (ता. माळशिरस) या गावांना जोडणाऱ्या नीरा नदीवरील पुलासाठी केंद्रीय मार्ग निधीतून तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांचा अनेक वर्षांचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः शिक्षणासाठी नदी ओलांडून होडीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची धोकादायक कसरत आता थांबणार आहे. (Pune News)
निमसाखर हे परिसरातील प्रमुख व्यापारी केंद्र आणि शैक्षणिक हब म्हणून विकसित झाले आहे. येथे असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, निमसाखरच्या दक्षिणेला वाहणाऱ्या नीरा नदीपलीकडे असलेल्या बांगर्डे गावातील नागरिकांना बाजारपेठ, शिक्षण आणि अन्य दैनंदिन कामांसाठी निमसाखरवर अवलंबून राहावे लागते. नदीवर पूल नसल्याने विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून होडीतून प्रवास करावा लागत होता. ही परिस्थिती पालकांसाठीही चिंतेचा विषय बनली होती.
केवळ बांगर्डेच नव्हे, तर निमसाखर, दगडवाडी आणि निरवांगी परिसरातील नागरिकांनाही माळशिरस तालुक्यात जाण्यासाठी लांबचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत होता. शेतीमालाची वाहतूक, शेतकऱ्यांचे व्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठीही हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर निमसाखर, दगडवाडी, निरवांगी आणि बांगर्डे येथील ग्रामस्थांनी पुलाच्या मागणीसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या पुलासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. अखेर या प्रयत्नांना यश मिळून केंद्रीय मार्ग निधीतून २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “निमसाखर-बांगर्डे पूल हा दोन्ही तालुक्यांतील नागरिक, शेतकरी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया आणि आवश्यक प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.”
पूल उभारणीसाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाल्याने अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे निर्माण झाली असून, इंदापूर-माळशिरस तालुक्यांतील ग्रामीण भागाच्या विकासाला या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळणार आहे.
Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी
Ans: नीरा नदीवरील निमसाखर-बांगर्डे पुलासाठी केंद्रीय मार्ग निधीतून 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
Ans: इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या पुलाचा फायदा होणार आहे. विशेषतः होडीतून नदी पार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.
Ans: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचं नियोजन आहे.






