खालापूर : इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi Landslide) बुधवारी, 19 जुलै रात्रीच्या सुमारास कोसळलेल्या दरड दुर्घटनेतील मृतांच्या संख्या आतापर्यंत 27 वर पोहोचली आहे. यामध्ये 57 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती दिली जात आहे. इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 17 ते 18 घरांवर 15 फूट मातीचे ढिगारे कोसळलेले आहेत. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. ही वाडी अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्यानं जेसीबी किंवा हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे एनडीआरएफ आणि टीडीआरएफचे जवान भर पावसात आणि चिखलात श्वान पथकाच्या मदतीनं, हातानं हा मातीचा ढिगारा उपसत आहेत. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 143 जणांना जिवंत बाहेर करण्यात यश आलय. दरम्यान, आता येथे कालपासून (रविवार) बचावकार्य थाबवण्यात आलं आहे. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. (Rescue work stopped in Irshalwadi, Guardian Minister Uday Samant informed; 57 still missing 27 dead)
बचावकार्य थांबवले…
इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 143 जणांना जिवंत बाहेर करण्यात यश आलय. दोन कुटूंब पूर्ण मयत आहेत. सरकारकडून वाचलेल्या ग्रामस्थांची तात्पुरत्या स्वरूपात कंटेनरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या कंटनेरची अवस्था वाईट असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणण आहे. सरकार सिडकोच्या माध्यमातून ग्रामस्थाचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणार आहे. चार दिवसाच्या बचाव कार्यानंतर आता हे काम थांबवत असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एकूण 228 लोकसंख्या असलेल्या गावात 27 जणांचा मृत्यू झालाय तर 57 जण अद्याप बेपत्ता आहेत.
बचावकार्यात अनेक अडथळे…
दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटना बचाव कार्य कालपासून (रविवार) थांबवण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे शोधकार्यात प्रचंड अडचणी येत होत्या, यंत्रसामुग्रीची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात चिखल, दगड आणि मोठमोठी झाडे सर्वत्र पसरल्याने मदतकार्य कठीण बनले. राष्ट्रीय आपत्ती कृतिदलाचे जवान, ‘एल अँड टी’चे कामगार, अपघातग्रस्त मदत पथक, स्थानिक तरुण, इर्शाळवाडीतील ग्रामस्थ आणि कोल्हापूर व्हाइट आर्मीचे जवान आदींनी मृतदेह व गाडल्या गेलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण यात अनेक अडथळे आले. दुर्घटना होऊन चार दिवस झाल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच येथे औषध फवरणी करण्यात आली आहे.