'तू काय पालिकेचा मालक आहेस का?'; माजी आरोग्य निरीक्षकांची साताऱ्यात बाचाबाची (File Photo : Satara)
सातारा : सातारा नगरपालिकेने यंदा रेकॉर्ड ब्रेक 85 टक्के वसुली केली आहे. 52 कोटींपैकी तब्बल 44 कोटी 50 लाखांचा महसूल वसुली विभागाने राबवलेल्या विविध मोहिमांमुळे पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. यामध्ये प्रशासक मुख्याधिकारी अभिजित बापट यांचा मोठा वाटा आहे. सातारा नगरपालिकेला पाणीपट्टी घरपट्टी, शिक्षण कर, रोजगार हमीसह अन्य प्रकारचे कर मिळून असे 52 कोटींचे उद्दिष्ट गाठायचे होते.
नवीन वर्ष सुरू होताच मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कर वसुली मोहिमेला गती दिली. कर वसुलीसाठी शहर व हद्दवाढ भागात दहा पथकाची नेमणूक करण्यात आली. नागरिकांना वेळेत कर भरता यावा, यासाठी माय सातारा ॲप आणि क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला. शहरातील बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करून नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. त्यामुळे अनेक जण कर भरण्यासाठी पुढे सरसावले. नगरपालिकेच्या तिजोरीत यंदा 52 कोटींपैकी तब्बल 44 कोटी 50 लाखांचा महसूल जमा झाला. यापैकी शिक्षण कर व रोजगार हमी योजनेचे 8 कोटी रुपये शासनाला जमा केले जाणार आहे.
थकबाकीदारांच्या 41 मालमत्ता सील
थकबाकीदारांच्या 41 मालमत्ता सील करण्यात आल्या तर 64 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. या कारवाईची धास्ती घेत अनेक थकबाकीदार कर व थकबाकी करण्यासाठी पुढे आले. यंदाचे हे उद्दिष्ट गेल्या सोळा वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचे उद्दिष्ट आहे. 2008 मध्ये पालिकेने एकूण उद्दिष्टाच्या 96 टक्के उद्दिष्ट प्राप्ती केली होती. सातारा नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांनी वेळेत कर भरणा करून नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.