गोंदिया : आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केला जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात आहे. सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. मागील दोन वर्षांचा अभ्यास केला तर अनेक वस्तूंच्या किमती दुप्पट झाल्याचे दिसून येते. पोटाची खडगी भरण्यासाठी अनेक बेरोजगार खासगी कंपनीत नोकऱ्या करीत आहे.
शासकीय नोकरदारांना सातवा वेतन आयोग मिळत असला तरी खासगी कंपन्यांना नोकऱ्या करणाऱ्यांना तुटपुंज्या वेतनावर कुटुंबाचा डोलारा सांभाळावा लागत आहे. वर्ष उलटतात, मात्र या नोकरदारांचे वेतन वाढत नाही. अशातच दरवर्षी महागाई वाढत असल्यामुळे अनेकांचे कौटुंबिक बजेट कोलमडले आहे. संसार चालविताना दमछाक होत आहे. अशातच आता बहुतांश दुकानदारांकडूनही लुबाडले जात आहे. वजनात घोळ करून ग्राहकांची लूट केली जात आहे. एका किलोचे पैसे दिल्यानंतर पाऊण किलोच वस्तू ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. तरबेज दुकानदार हा तराजूचा खेळ अत्यंत सराईतपणे करीत असल्याने अनेक ग्राहकांच्या हा प्रकार लक्षात येत नाही. मात्र सुज्ञ ग्राहकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर दुकानदारांसोबत बाचाबाची होताना दिसत आहे. ग्राहकांची ही सर्रास लूट होत असतानाही याकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष नाही, हे आणखी ग्राहकांचे दुर्दैव.
तांदूळ, साखर, गहू व इतर किराणा वस्तू मोजून देताना काही दुकानात इलेक्ट्रानिक तराजूचा वापर होतो. तर काही ठिकाणी वजनमापे ठेवलेल्या साध्या तराजूचा वापर होत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी बहुतांश दुकानदार तराजूचा खेळ करीत ग्राहकांना कमी वस्तू देत त्यांची लूट केली जाते. अनेक दुकानातील वजनांचे पासींगच केले नसल्याची माहिती आहे. अनेक दुकानात वर्षानुवर्षापासून तेच ते एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलोचे वजन वापरले जात आहे. बदाम, काजू, खसखस यासारख्या महागड्या वस्तू ग्रॅमनेच खरेदी केल्या जातात. मात्र ग्रॅमच्या वजनाऐवजी नाणी वापरली जात आहे.
वजनांचे पासिंग नाही
दरवर्षी दुकानदारांकडे असलेल्या वजनांची पासींग होणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुकानदारांकडील वजनाची पासींगच केली जात नाही. वर्षानुवर्ष एकच वजन दुकानदार वापरत असल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक भरडला जात आहे. काही भाजीविक्रेते भाजीपाला मोजून देतात. मात्र अनेकांकडे अधिकृत वजनाऐवजी दगड, लोखंड यांचा वापर केला जात आहे.