संग्रहित फोटो
सातारा : ज्या प्रमाणे महाविकास आघाडीची फुटाफुट महाबळेश्वरात झाली त्याच प्रमाणे महायुतीची फुटाफुट महाबळेश्वरातूनच करु. शरद पवार यांनीही महाबळेश्वरातून निर्णय घेतला होता. तसेच महायुतीचे आमचे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांच्या पक्षाला जर महायुतीत मानाचे स्थान निवडणूकीत दिले जात नसेल, कार्यकर्त्यांचा योग्य तो मानसन्मान केला जात नसेल तर येत्या निवडणूकीत आम्ही वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा रिपाईच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.
सातारा येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वप्नील गायकवाड, अप्पा तुपे, श्रीकांत निकाळजे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अशोक गायकवाड म्हणाले, आता आम्ही येणाऱ्या निवडणूकांच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली आहे. कार्यकर्त्याची मते जाणून घेत आहोत. केंद्रात आठवले मंत्री झाल्यापासून 2014 पासून आम्ही महायुती सोबत सत्तेत आहोत. परंतु स्थानिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. आजपर्यंत महायुतीच्या घटक पक्षातील भाजपाकडून कोणत्याच आश्वासनांची पूर्तता झाली नाही. लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुकांमध्ये आमचा विचार केला नाही. परंतु आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी आमच्या हक्काच्या आम्हाला जागा द्यायला हव्यात, जेथे जेथे आरक्षण आहे त्या त्या जागा रिपाईच्या आठवले गटाला सोडाव्यात, किमान सातारा जिह्यात 6 जागा तरी सोडाव्यात, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.
आम्ही महायुतीसोबत असलो तरीही आम्हाला आजपर्यंत वंचित ठेवले आहे. त्याकरता लवकरच भाजपाने आमच्यासोबत बैठक लावून एकदाचा सोक्षमोक्ष लावावा, नियोजन समितीवर दोन नावे दिली होती तीही डावलली गेली. आमच्या मागून जे पक्ष महायुतीत आले त्यांना संधी दिली गेली. त्यामुळे आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, आमच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता नसली तरीही निवडून न आणण्याची क्षमता आहे. कुणाला कुठे बसवायचे हे आम्ही नक्कीच ठरवू शकतो, असे सांगत अशोक गायकवाड म्हणाले, आठवले सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर दिनांक २७, २८ रोजी येत आहेत. त्याचवेळी हा निर्णय घेवू, गटनिहाय माहिती मागवली असून कार्यकर्त्यांकडून आढावा घेत आहोत. आम्ही स्वबळाची तयारी सुरु ठेवली आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न झाल्याने सर्वसामान्य माणूस असुरक्षित आहे. निवडणूका नाही घेतल्या तर सर्वसामान्य माणूस उद्धवस्त होईल, अशीही भिती त्यांनी व्यक्त केली.
कुसगावचा लढा सुरुच राहिल
यावेळी बोलताना स्वप्नील गायकवाड म्हणाले, कुसगाव क्रेशरचे आंदोलन आता तुर्तास थांबले असले तरीही आमचा लढा सुरुच राहणार आहे. हा शेतकऱ्यांचा लढा होता. पायाला फोड येईपर्यंत चालत जावून मंत्रालयाच्या उंबऱ्यावर शेतकऱ्यांनी टाहो फोडला तरीही प्रशासनाला दयामाया आली नाही. नियम बनवाचे आणि ते वाकवायचे हे सत्ताधऱ्यांकडूनच शिकावे लागते. त्यामुळे हा सामान्याचा लढा आणि लढाई सुरुच राहिल, असाही इशारा स्वप्नील गायकवाड यांनी यावेळी दिला आहे.