मुरबाड : शैक्षणिक क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी पुण्यात मागील अनेक वर्षापासून ‘महाराष्ट्र प्रज्ञा शोध’ ही परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेत राज्यभरातून विद्यार्थी सहभाग घेत असतात. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातर्फे गेल्या अनेक वर्षापासून शालेय स्तरावरील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ‘प्रज्ञा शोध परीक्षेत’ यावर्षी ओंकार एज्युकेशन सोसायटीचे एस. व्हि.शेट्टी इंग्लिश मिडीयम स्कूल, मुरबाड या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कु. निधी किरण यशवंतराव हिने तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. या यशामुळे कु. निधी तसेच शाळेचेही सर्व स्तरावर कौतुक होत असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रचंड मेहनत, जिद्द व शाळेच्या सहकार्यामुळं यश
शाळेचे हरहुन्नरी मुख्याध्यापक श्री. डोहळे सर यांनी सांगितले की, आमच्या विद्यार्थ्यांची मेहनत व जिद्द,सहकारी शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळं हे यश मिळाले आहे. या सर्वांबरोबरच मुरबाड तसेच बदलापूर शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेले आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय गजानन टोहके सर व सौ. टोहके मॅडम या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. असं मुख्याध्यापक श्री. डोहळे सर यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षा आजच्या शिक्षणाचा अविभाज्य घटक
यावेळी शाळेचे विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारे, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेपासून यूपीएससी या परीक्षांचे मार्गदर्शक व्याख्याते, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचे ठाणे जिल्हा समन्वयक श्री. संजय ठाकरे सर यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन केले आहे की, स्पर्धा परीक्षा हा आजच्या शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरील स्कॉलरशिप, होमी भाभा, एम टी एस ई, एन टी एस ई इत्यादी स्पर्धा परीक्षांची तयारी करून, भविष्यातील करिअरचा पाया मजबूत करावा व आपले उज्वल भवितव्य घडवून देशाच्या विकासात योगदान द्यावे. असं ठाकरे सर यांनी विद्यार्थी व पालकांना आवाहन केले आहे.