Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
सातारा : जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत ठेवा. येणाऱ्या प्रत्येक कॉलला सकारात्मक प्रतिसाद द्या. तसेच कॉलच्या नोंदी ठेवा. ज्या पुलांवर पाणी येते ते पूल वाहतुकीसाठी तातडीने बंद करा. त्याठिकाणी बॅरीकेटींग लावून सूचनाफलक लावा. अन्य मार्गाने वाहतूक वळवा. पावसाचा वाढता जोर पाहता आवश्यकता भासणाऱ्या ठिकाणी नागरिकांचे व पशुधनाचे तातडीने स्थलांतरण करा आणि अनुषंगिक सुविधांची आवश्यक ती उपलब्धता ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगून नागरिकांनीही पुराच्या पाण्यात वाहने नेण्याचे अनाठायी धाडस करु नये, पाण्यात उतरु नये, असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीवरुन जिल्ह्यातील पर्जन्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व अन्य यंत्रणांचे प्रमुख उपसित होते.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाढता जोर पाहता कोयनेसह सर्व धरणातील विसर्ग वाढवावा लागू शकतो. कोयना, कृष्णाच्या अनुषंगाने पाटण, कराड तालुक्यांनी विशेष दक्ष राहावे, सतत पाऊस सुरु असल्याने जेवढा पाण्याचा येवा धरणात येत आहे तेवढे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे कोयना धरणातून एक लाख क्युसेकने पाणी सोडले जाऊ शकते. अशा परिस्थितीत जी कुटुंबे बाधित होतात, अशी कुटुंबे तात्काळ स्थलांतरीत करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले आहेत. जे रस्ते व पुलांवर पाणी येऊन वाहतुकीसाठी बंद झाले आहेत, त्याची माहिती ताबडतोब जिल्हा प्रशासनाला द्यावी.
तसेच दरडप्रवण गावात तलाठी, ग्रामसेवक यांनी फिल्डवर जाऊन पाहणी करावी व लोकांशी संवाद साधावा. वैद्यकीय निकड असणारे रुग्ण, गरोदर महिला अशा रुग्णांची माहिती संकलित करुन ठेवावी. विशेषत: महाबळेश्वर, जावळी, पाटण या भागात अधिक दक्षता घ्यावी.
जिल्ह्यात धबधब्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर
जिल्ह्यात धबधब्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, अशा ठिकाणी पर्यटक अडकले असल्यास माहिती घ्यावी, ज्या बसस्थानकांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो अशा ठिकाणी प्रवासी अडकले आहेत का याची शहानिशा करावी आणि अशी स्थिती असल्यास अशा प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी यावेळी दिले.