Shaktipeeth Expressway: "... तर आमची रक्त सांडायची तयारी आहे"; शक्तीपीठविरुद्ध शेतकरी आक्रमक
सांगली: राज्य सरकारने नुकतेच शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन करण्यास मान्यता दिली आहे. मात्र या प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होत आहे. दरम्यान आता या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अंकली येथे शेतकरी एकत्रित येणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे अश्वासन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या आश्वासनाला सरकारने हरताळ फासत 12 जिल्ह्यात जमीन मोजणीस पोलीस बंदोबस्तात सुरवात केली आहे. सरकारच्या या कृतीला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतीकार करीत आहेत. आणि मोजणी बंद पाडीत आहेत.
सरकारच्या या कृतीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सांगलीत बाधित शेतकरी प्रतिनीधींची बैठक पार पडली. १ तारखेस अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अगोदर संवाददुत म्हणुन आलेल्या अधिकऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावले. त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आले नाहीत.
शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येत, आप-आपल्या गावातुन संवाद दुत म्हणुन आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळवून लावले. व कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्या पावली परत फिरावे लागले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील, तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालु देणार नाही. हे शेतकऱ्यांनी या अगोदर देखिल दाखवुन दिले आहे. आता ही शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. हा इशारा आम्ही सरकारला देत आहोत.
शक्तिपीठमुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे. सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेक वेळा सांगुन देखील मुख्यमंत्री आणी त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. म्हणुन ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई जशी रस्त्यावर राहील, तशी आमच्या गावात आणि शेतात राहील. त्याचा पहीला हिसका गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवला आहे. पुढेही दाखवु पण महामार्ग होऊ देणार नाही. आमची शेती वाचवण्यासाठी आमची रक्त सांडायची देखील तयारी आहे. दि. १ जुलै हा कृषी दिन आहे, विधानसभेचे अधिवेशन चालु होत आहे. म्हणून या दिवशी रास्ता रोको करणार आहोत. सांगली जिल्ह्यातील १९ गावातील शेतकऱ्यांनी, तसेच महापुर बाधित जनतेने १ जुलै रोजी १० वा. अंकली चौकात मोठ्या संख्येनी या आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.