पुण्यातील सारसबाद महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Dasara 2025 : पुणे : विजयादशमीचा उत्सव मोठ्या आनंदाने सर्वत्र साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सव आणि त्यानंतर आता दसरा सणाची मोठी धामधुम पुण्यामध्ये दिसून येत आहे. शहरी भागातील सर्व देवींच्या मंदिरे भाविकांनी पूर्णपणे भरुन गेली आहेत. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले. यानंतर दसऱ्याच्या निमित्ताने पुण्यातील सारसबाग येथे असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांच्या अक्षरशः झुंबड उडाली आहे. देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण दहा दिवस आणि विजयादशमीनिमित्त भाविकांनी रांग लावली आहे. आज महालक्ष्मी देवीचे रुप अतिशय सुंदर दिसत आहे. महालक्ष्मीला आज सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली. महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान केल्याचे पुणेकरांना कौतुक आणि आनंद असतो. देवीचे हे रुप पाहण्यासाठी हजारो भाविक भक्तीभावाने येत असतात. यंदाही महालक्ष्मीला विजयादशमीदिनी सोन्याची साडी घालण्यात आली आहे. दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली आहे. त्यावर अतिशय सुबक असे नक्षीकाम देखील कोरलेले आहे. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे वषार्तून दोनदा ही साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला आदींनी उत्सवाचे आयोजन केले आहे.
डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, पुरातन काळापासून दस-याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे, याकरिता दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवी भक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विजयादशमीला रात्री ९ वाजता प्रतिकात्मक रावणदहन
विविध सामाजिक समस्यांच्या प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करुन रावण दहन केले जाते अशी हिदू परंपरा आहे. याच परंपरेचे पालन करत महालक्ष्मी मंदिरासमोर रात्री ९ वाजता रावणदहन करण्यात येणार आहे. यावेळी तब्बल २५ फूट उंच प्रतिकात्मक रावणाचे दहन यावेळी करण्यात येईल. प्रतिकात्मक रावणाचे दहन करुन समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश यानिमित्ताने देण्यात येणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी केले आहे.