फोटो सौजन्य - सोशल मिडीया
गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यातील ससून रुग्णालय चांगलंच चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा ससून रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी हा प्रकार समोर आणला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
हेदेखील वाचा – मुंबई पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील हवामान अंदाज
दादासाहेब गायकवाड हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते बेवारस रुग्णांची सेवा करतात. दादासाहेब गायकवाड बेवारस रुग्णांना उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करतात. पण या बेवारस रुग्णांसोबत ससूनमध्ये गैरप्रकार केला जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दादासाहेब गायकवाड यांनी एका बेवारस रुग्णाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी गायकवाड त्या रुग्णाला भेटण्यासाठी ससून रुग्णालयात गेले, तेव्हा तो रुग्ण तिथे नव्हता. या प्रकारामुळे गायकवाड यांना धक्का बसला. त्यांनी चौकशी केली असता रुग्णालयातील एक डॉक्टर त्या रुग्णाला रात्री बाहेर घेऊन गेले पण परत आणलेच नाहीत, अशी माहिती समोर आली. यानंतर गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.
हेदेखील वाचा – नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला! दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
गायकवाड यांना माहिती मिळाली की, रुग्णालयात बेवारस रुग्णांसबोत गैरप्रकार सुरु आहे. या मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड यांच्यासोबत ससून रुग्णालाबाहेर रात्रीच्या वेळीस पाहणी सुरु केली. यावेळी त्यांना आढळले की, सोमवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील एक डॉक्टर दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेल्या अशा एका रुग्णाला रिक्षात बसवत होता. यानंतर डॉक्टरने त्या रिक्षा चालकाला सांगितलं की, संबंधित रुग्णाला इथून लांब नेऊन सोड, पुन्हा तो रुग्णालयात आला नाही पाहिजे, अशा ठिकाणी नेऊन सोड.
‘नेमकं कुठं सोडू? मी एकटा कसा सोडू, नातेवाईक पाहिजे सोबत’ असं त्या रिक्षा चालकाने डॉक्टराला विचारलं. तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो, असं त्या डॉक्टरने रिक्षा चालकाला सांगितलं. यानंतर डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी त्या रुग्णाला रिक्षातून विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ सोडून आले. हा सर्व प्रकार लक्षात येताच रितेश गायकवाड यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.