
Satara News, Satara Municipal Council,
Satara News: सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागात टेंडर पद्धतीने कार्यरत असलेल्या १११ महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना अनेक दिवसांपासून वेतन न मिळाल्याने मंगळवारी नगरपालिकेत संतप्त वातावरण निर्माण झाले. रखडलेल्या पगाराबाबत जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी नगरपालिकेत दाखल झाले आणि तातडीने वेतन अदा करण्याची मागणी केली.
आरोग्य विभागासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी कंत्राटी पद्धतीने या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीनंतर कर्मचारी नियमितपणे सेवा बजावत असतानाही अद्याप त्यांच्या खात्यात वेतन जमा झाले नसल्याने अनेकांवर आर्थिक अडचणींचे संकट ओढवले आहे.
पगाराबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधण्यास सांगण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, ज्या ठेकेदारामार्फत नियुक्ती करण्यात आली, त्याचे नाव, कार्यालय किंवा संपर्क क्रमांकाची माहितीच प्रशासनाने दिलेली नसल्याने कर्मचारी संभ्रमात पडले आहेत.
“कामावर रुजू करून घेताना सर्व प्रक्रिया नगरपालिकेने केली. आता वेतनाची मागणी केली तर ठेकेदाराकडे जाण्यास सांगितले जाते. पण तो ठेकेदार कोण, हेच आम्हाला माहीत नाही. अशा परिस्थितीत आमच्या हक्काच्या पगारासाठी कुणाकडे दाद मागायची?” असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
रखडलेले वेतन तात्काळ अदा करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला. या घटनेमुळे टेंडर पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वेतन व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, नगरपालिकेचे प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.