दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील शिवसाई रेसिडेन्सी लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत रोशनकुमार सिथारामा शेट्टी, साबिर मोहम्मद खान, सनद संजीव दास, राहुलकुमार उर्फ कैलाश राकेशकुमार आणि आमिर करम शेर खान हे आरोपी ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेले पैसे अवैधरीत्या बँक खात्यांत स्वीकारत असल्याचे आढळून आले.
तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी विविध मॅट्रीमोनिअल साईट्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नागरिकांशी मैत्री करून विश्वास संपादन करायचे. त्यानंतर बनावट वेबसाईट्सच्या लिंक्स पाठवून फॉरेक्स व गोल्ड ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळेल, असे भासवून वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले जात होते. या पद्धतीने देशभरातील अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4 कडे वर्ग करण्यात आला. पुढील तपासात अभिषेक अनिल नारकर ऊर्फ गोपाळ व मोहम्मद रशिद फकीर मोहम्मद बलोच ऊर्फ लक्की यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींच्या बँक खात्यांच्या तपासातून महाराष्ट्रासह मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, जळगाव, धुळे तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील विविध सायबर पोलीस ठाण्यांत दाखल असलेले 51 गुन्हे उघडकीस आले आहेत.
आतापर्यंतच्या तपासात देशभरातील सामान्य नागरिकांची 200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार भारताबाहेरून कामकाज करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–4चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.






