संग्रहित फोटो
विटा/दीपक पवार : पुणे पदवीधर निवडणूकीस एक वर्षाचा कालावधी असला तरी निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे पडसाद आतापासूनच उमटू लागले आहेत. डावीकडून उजवीकडे गेलेले क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रामराम करीत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. अशातच आता शरद पवार यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून नवा कसलेले पैलवान शोधला आहे.
माण-खटावचे नेते, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. देशमुख यांनी पुणे पदवीधरच्या अनुषंगाने विटा येथील बळवंत महाविद्यालयामध्ये रयत सेवकांची बैठक घेऊन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीपासून माध्यम प्रतिनिधींना चार हात दूर ठेवले होते. देशमुख यांची सासुरवाडी खानापूर तालुक्यातील लेंगरे आहे. जावयाने सासुरवाडीतून पुणे पदवीधरचे रणशिंग फुंकले आहे. काॅग्रेसमधून पलूस-कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांचे पुतणे भारती बॅकेचे संचालक डॉ. जितेश कदम यांचे नाव चर्चेत आले आहे.
‘क्रांती’ परिवार मतदार नोंदणीत पारंगत
लाड यांनी कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची या इराद्याने भाजपत प्रवेश केला आहे. त्यांनी क्रांती परिवाराच्या माध्यमातून मतदार नोंदणी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दोन वेळाचा पूर्वानुभव लक्षात घेता ‘क्रांती’ परिवार मतदार नोंदणीत पारंगत झाला आहे. नोंदणीमधील बारकावे, मतदार नोंदणीत सध्या आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचे भैय्या माने यांचे नाव चर्चेत आणले आहे.
दांगडा प्रशासकीय अनुभव पाठिशी
शरद पवार यांनी अत्यंत हुशारीने देशमुख यांचे नाव चर्चेत आणले आहे. देशमुख यांनी प्रांताधिकारी ते पुणे विभागीय आयुक्त अशी विविध पदे भूषविली आहेत. दांडगा प्रशासकीय अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शिवाय रयत शिक्षण संस्थेचे ते कौन्सिल सदस्य आहेत. शरद पवार यांचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. देशमुख यांनी आपली सगळी यंत्रणा नोंदणीच्या कामासाठी लावली आहे.