संग्रहित फोटो
मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे.
राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवले आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे आणि जे जाहीर केले तेही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. जगाचा पोशिंदा बळीराजावर काळी दिवाळी करण्याची वेळ आहे आणि या परिस्थितीला शेतकरी विरोधी महायुती सरकारच जबाबदार आहे. भाजपा महायुती सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली.
अतिवृष्टीने राज्यातील ३० जिल्ह्यातील ३५० तालुक्यात सर्व वाहून गेले आहे. लाखो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. हेक्टरी ५० हजार रुपये, जमीन खरडून गेली त्यासाठी हेक्टरी ५ लाख रुपये व कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली होती पण भाजपा महायुती सरकारने जुन्याच योजनांची गोळाबेरीज करून ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण हे पॅकेज फसवे निघाले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देण्याचे आश्वासनही फेल गेले असून, सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर पिठलं भाकर आंदोलन करणार आहे. सर्व जिल्हे, तालुका व गावागावात हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.