मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर राज्याला नवीन उपमुख्यमंत्री मिळाला. राष्ट्रवादीच्या 9 जणांनी शपथ घेतली. यामध्ये त्यांना मंत्रिपदे देण्यात आली. आता यावरून शरद पवार आणि अजित पवार यांचे समर्थक यांच्यात मोठी खडाजंगी होऊ लागली आहे.
दोन्ही नेत्यांचे समर्थकांमध्ये संभ्रम
दोन्ही नेत्यांचे समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीवर दावा ठेवला आहे. आमचीच राष्ट्रवादी म्हणत त्यांनी काल महत्त्वाच्या नेमणुका केल्या तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्याकडील महत्त्वाच्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी प्रथम सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना प्रथम बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादीची बांधणी करणार
हे सर्व नाट्य चालू असतानाच, शरद पवार यांनी गुरुपौर्णिमेला कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रवादीची बांधणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते पाठिंब्याला रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवार मैदानात
शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत, मीडियासमोर आपली जाहीर भूमिका मांडली. मी लोकांमध्ये जाऊन पक्षबांधणी करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हे स्पष्ट झाले की, राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांवर कारवाई होणार आहे.
समर्थकांमध्ये खडाजंगी
आता राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. नाशिक येथेसुद्धा शरद पवार आणि अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळली.
नेत्यांच्या फोटोंना काळे
अनेक पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांच्या फोटोंना काळे फासण्यात आल्याचे दिसून आले. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर दुसरे सर्वात मोठे बंड राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे संभ्रमाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी मोठी फूट
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी मोठी फूट पडली आहे. यानंतर राष्ट्रवादी कोणाची यावरुन वाद सुरु आहे, तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष व निवडणूक चिन्हावर आपला दावा केला आहे. तर शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये देखील भाजपाने फूट पाडली, यात भाजपा यशस्वी झाले. पण या फूटीमुळं राष्ट्रवादीतीने नेते व कार्यकर्ते खूप दुखावले असून, हे सर्व कोणी घडवून आणले, यामचा सुत्रधार कोण आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना, आता यावर आमदारा रोहित पवारांनी (Rohit Pawar) एक ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.