Sharad Pawar on Devendra Fadnavis Allegations : मनोज जरांगे हे शरद पवारांनी दिलेली स्क्रिप्ट बोलत असल्याचे वक्तव्य उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. दरम्यान, शरद पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांना स्वतः पवारांनीच उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद घेत, यावर बोलताना शरद पवार यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया देत “मी महाराष्ट्रात असे पोरकट वक्तव्य यापूर्वी कधी पाहिले नाही. जरांगेंना भेटून मी सांगितले दोन समाजांत अंतर वाढेल असे काही करू नका. त्यानंतर माझे आणि त्यांचे बोलणे नाही.” असा स्पष्ट खुलासा त्यांनी करीत सर्व आरोप धादांत खोटे असल्याचे सांगितले.
जबाबदार व्यक्तीने असे वक्तव्य करू नये
जबाबदार लोकांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदासारख्या एखाद्या जबाबदार पदावर बसल्यानंतर त्या व्यक्तीने जबाबदारीने बोलायला हवं. त्यांचं वक्तव्य हे पोरकटपणाचं आहे. एखादी जबाबदार व्यक्ती इतखं खोटं बोलताना मी यापूर्वी कधी पाहिलं नाही. मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांचं वर्तन पाहिलं आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं असे वर्तन मी कधी पाहिलं नव्हतं….
शरद पवार म्हणाले, मनोज जरांगे आणि माझ्या संबंधांबद्दल बोलायचं झाल्यास मी आतापर्यंत त्यांना केवळ एकदाच भेटलो आहे. जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे त्यांचं उपोषण सुरू झाल्यावर मी त्यांना सर्वात आधी भेटायला गेलो होतो. मी त्या भेटीवेळी त्यांना सांगितलं की, तुमच्या मागण्या मी समजू शकतो. परंतु, हे आंदोलन करत असताना दोन समाजांमधील अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य टिकेल असं आंदोलन करा. त्यावेळी आम्हा दोघांमध्ये एवढंच संभाषण झालं. त्यानंतर आजअखेर एका शब्दाने आमचं बोलणं नाही की भेट नाही. असं असतानाही त्या दोघांनी (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री) माझ्यावर असा आरोप करणं चुकीचं आहे. प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांनी असं बोलायला नको होतं.
राजेश टोपेंवर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. हा गुंता सोडवण्यासाठी राजेश टोपेंची मदत घेतली जात होती. तुम्ही एसआयटी नेमा आणि काहीही नेमा ‘कर नाही त्याला डर कशाला’, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लावला.