सौजन्य -नवराष्ट्र टीम
कुरुंदवाड : दोन वर्षांपूर्वी ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. त्या सर्व गद्दारांना गाडण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना निश्चित जागा दाखवू, असा विश्वास शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. नृसिंहवाडी येथे आयोजित शिरोळ-इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आमदार जाधव म्हणाले, गद्दारांना पाडण्याचे काम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी करून दाखवले आहे. भाजपची घमेंड उतरवली आहे. देशात चारसाे पार व राज्यात ४५ प्लस म्हणत होते. त्यांना सतरावर आणून ठेवले.
शिवसैनिक भाजपची घमेंड उतवेल
भाजपने शिवसैनिकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिसांचा जाच, एसआयटीचा त्रास देऊन बेजार केले होते. शिवसेना पक्ष फोडला. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. मात्र आजही त्यांची घमेंड कायम आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत पेटलेला शिवसैनिक त्यांची घमेंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.