पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ऐतिहासिक इमारतीमध्ये शिव्यांचा भडीमार व अश्लील वाक्यांचा वापर करून रॅप साँग (Rap Song) शूट करण्यात आले होते. अशा गाण्यांसाठी विद्यापीठाने परवानगी दिली होती का? दिली नसेल तर मग ऐतिहासिक इमारतीमध्ये असा शिवीगाळ केलेला व्हिडिओ शूट कसा होतो? असे अनेक प्रश्न विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी उपस्थित करत आहेत. त्यात आता राजकीय वातावरण तापत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याला आधी विरोध केला होता पण आता पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. तर युवासेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
पुणे विद्यापीठाच्या आवारात आणि मुख्य इमारतीत चित्रित केलेले रॅप साँग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेऊन या गाण्याचे विद्यापीठात चित्रीकरण करण्यास विद्यापीठ प्रशासनाने परवानगी कशी दिली? असा आक्षेप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे घेतला होता. पण त्यानंतर या गाण्याच्या चित्रीकरणाला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करत विद्यापीठाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून संबंधित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रॅप गाणे केलेल्या तरुणाला पाठिंबा दिला होता.
राष्ट्रवादीचा पाठिंबा तर युवा सेनेचा विरोध
याशिवाय, या रॅप साँगला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हाड यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पाठिंबा दिला. रॅप गाण्याच्या माध्यमातून व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शक्तीनिशी उभी राहील, असे म्हणत पाठिंबा दर्शवला. मात्र, युवासेना या रॅप साँगविरोधात असल्याचे दिसून आले. त्यावरून युवासेना आक्रमक झाली आहे.